गांधी फौंडेशनचा पुढाकार; कराडमध्ये ३० संकलन केंद्रांवर ई-कचऱ्याचे संकलन
कराड/प्रतिनिधी : –
येथील गांधी फौडेशन, कराड नगरपालिका, तसेच अन्य सामाजिक संस्थांच्यावतीने शहरात ई-कचरा (इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रीकल) संकलन अभियान रविवार (दि. २६) जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत शहरात ३० संकलन केंद्रांमध्ये हा ई-कचरा संकलित करण्यात येणार असल्याची माहिती गांधी फौंडेशनचे अध्यक्ष धीरज गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषद : ई-कचरा संकलन उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उपस्थित मान्यवर : यावेळी एन्व्हायरो फ्रेंडस नेचर क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशिद, अॅड. संभाजीराव मोहिते, डॉ. मिहीर वाचासुंदर, नगरपालिका आरोग्य निरीक्षक देवानंद जगताप, शासकीय अभियंता महाविद्यालयाचे अळसुंद, नगरपालिकेचे माजी अभियंता ए. आर. पवार, पूर्णम इको व्हिजनचे अमोल सोडक यांची उपस्थिती होती.
जागृती गरजेची : आमच्याकडे अजून ई-कचरा बाबतीत तेवढी माहिती नाही. त्यामुळे ई-कचरा संकलनाची जनजागृती होणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगत श्री गांधी म्हणाले, ई-कचरा शरीरासाठी अत्यंत धोकादायक असतो. याचे दुष्परिणाम माहित नसल्याने अनेक आजारांना त्यामुळे निमंत्रण मिळत आहे. प्रत्येक घरामध्ये ई-कचरा असतोच. मात्र, त्याचे गांभीर्य नसल्याने वर्षानुवर्षे हा कचरा घरामध्येच ठेवला जातो. नागरिकांमध्ये याबाबतची जनजागृती करणे व ई कचरा घराबाहेर काढणे यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
रिसायकलिंग : तसेच (दि. २६) जानेवारी रोजी शहरातील प्रत्येक पेठेमध्ये एकूण ३० ई-कचरा संकलन केंद्र तयार करण्यात येणार असून या संकलन केंद्रांमध्ये हा कचरा गोळा करण्यात येणार आहे. पुणे येथील पूर्णम कंपनीकडे हा कचरा देण्यात येणार असून याचे रिसायकलिंग करण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात यासाठी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

भव्य प्रबोधन रॅलीस प्रतिसाद
गुरुवार (दि. २३ रोजी दुपारी याच्या प्रबोधनासाठी शहरातून भव्य रँली काढण्यात आली. त्याची सुरुवात दत्त चौकापासून होऊन चावडी चौक, कन्या शाळा ते नगरपालिका येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये नगरपालिकेचे कर्मचारी, एन्व्हायरो क्लबचे सदस्य, तसेच ३०० नागरिक व कर्मचारी सहभाग झाले होते. या रॅलीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
