मुख्याधिकाऱ्यांविरोधात दोन हजार पालकांसह मोर्चा काढणार 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचा इशारा; शाळा क्रमांक तीनच्या विकासाकडे दुर्लक्ष 

कराड/प्रतिनिधी : – 

कराड नगरपरिषद शाळा क्रमांक तीनच्या विकासाकडे मुख्याधिकारी शंकर खंदारे हे जाणीवपूर्वक व राजकारण आणून दुर्लक्ष करत आहेत. शाळेच्या मागण्यांची सात दिवसांत पूर्तता न केल्यास शाळेच्या २ हजार विद्यार्थी, पालक व नागरिकांचा नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा यशवंत विकास आघाडी व शिवसेनेचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी दिला आहे.

निवेदन : याबाबतचे निवेदन राजेंद्रसिंह यादव यांनी मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना दिले आहे.

जाणीवपूर्वक दुर्लक्ष : या निवेदनात म्हटले आहे की, कराड नगरपालिका शाळा क्रमांक तीन ही गुणवत्ता व पटसंख्येत राज्यात अग्रेसर असून शाळेचा गुणगौरव देशपातळीवर झाला आहे. ही कराडच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. मात्र, सध्या या शाळेकडे मुख्याधिकारी तथा प्रशासक जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. यामध्ये ते राजकारण करीत असल्याची आमची खात्री झाली आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान : शाळा क्रमांक तीनच्या रविवार पेठेतील ३ वर्ग खोल्यांचे काम गेली १८ महिने मुख्याधिकाऱ्यांनी मुद्दाम सुरु केले नाही. त्यामुळे विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. शाळा रंगरंगोटी, मुताऱ्या, स्वच्छता, ड्रेनेजचे काम केले नाही. यामुळे मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

समन्वयक पदाची नेमणूक नाही : याउलट ज्या शाळेत विद्यार्थी नाहीत, अश्या शाळांना भौतिक सुविधा रंगरंगोटी करुन दिली आहे. यावरुन मुख्याधिकारी कोणाच्या तरी सांगण्यावरुन हे सर्व करीत असल्याचे दिसून येते. शाळा क्रमांक तीनमध्ये दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, तेथे मुद्दाम शिक्षक न देणे. ‘समन्वयक’ पदाची नेमणूक न करणे, हे जाणीवपूर्वक केले जात आहे.

सात दिवसांचा अल्टिमेटम : या सर्व गोष्टींमुळे शाळेच्या गुणवत्तेवर व पटसंख्येवर परिणाम होत आहे. महाराष्ट्रातील नावाजलेल्या नगरपालिकेच्या शाळेला सहकार्य न करण्याची भुमिका चुकीची आहे. या संदर्भात वरिष्ठ पातळीवरही आम्ही तक्रार करणार आहोत. वरील सर्व बाबी सात दिवसांत पुर्ण न केल्यास आपल्या कार्यालयावर दोन हजार विद्यार्थी, पालक व प्रभागातील नागरिकांचा नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येईल. या गोष्टीस सर्वस्वी तुम्ही जबाबदार राहाल, असा इशारा यशवंत विकास आघाडीचे नेते व माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी दिला आहे. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!