पॅंथर अशोक भोसले यांची माहिती; परिसंवाद व चर्चासत्रांचे आयोजन
कराड/प्रतिनिधी : –
आपल्या देशाचे संविधान हे लोकांनीच स्वीकारले आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून याच संविधानाला धोका निर्माण झाला आहे. देशात संविधान मानणारे 97 टक्के, तर न मानणारे एक ते दीड टक्केच लोक आहेत. आतापर्यंत छुपा विरोध करणारे हेच लोक 2014 पासून संविधानाविरोधात बोलू लागले आहेत. त्याहीपेक्षा संविधान जाळण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. त्यामुळे लोकांमध्ये संविधानाबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने कराडला सविधान जागर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भारतीय संविधान जनजागृती समितीचे, कराड शहराध्यक्ष पॅंथर अशोक भोसले यांनी दिली.
पत्रकार परिषद : येथील शासकीय विश्रामगृहात या संमेलनाची माहिती देण्यासाठी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संविधानातून समानतेचा संदेश : आपले संविधान समानतेचा संदेश देते, असे सांगत श्री भोसले म्हणाले, आपल्याला वागण्या, बोलण्याचे, विचारांचे स्वातंत्र्य देते. शिक्षण आणि मतदानाचा अधिकारही देते. तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधानाला का विरोध करत आहे? संविधान नष्ट करून त्याजागी त्यांना काय आणायचे आहे? संविधानाला विरोध करण्याचा त्यांचा उद्देश आणि त्यामागे त्यांचा फायदा काय आहे? आदींविषयी तज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
संमेलनाचे स्वरूप : रविवार (दि. 26) जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम जवळील सौ. वेणूताई चव्हाण सभागृहात सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० यादरम्यान हे संमेलन पार पडणार आहे. यामध्ये सकाळी १० ते ११ दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते वेणूताई चव्हाण सभागृहापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वा. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत स्वागत समारंभ व सकाळी ११.३० ते १२ दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. संजय राऊत आणि आ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ होणार आहे.
परिसंवाद : दुपारी १२.३० ते १.३० दरम्यान ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना निर्मितीची प्रक्रिया’ या विषयावरील परिसंवादात अॅड. जयदेव गायकवाड मार्गदर्शन करणार असून अध्यक्षस्थानी अॅड. प्रमोद तडाखे असतील.
पहिले चर्चासत्र : दुपारी १.३० ते २.३० दरम्यान ‘भारतीय संविधानाचे उद्देश’ या विषयावर अॅड. सुरेश माने मार्गदर्शन करणार असून अध्यक्षस्थानी प्राचार्य कादर नायकवडी असतील.
भोजन : या संमेलनास उपस्थित असणाऱ्यांसाठी दुपारी २.३० ते ३ दरम्यान जेवण व्यवस्था करण्यात आली आहे.
दुसरे चर्चासत्र : दुपारी ३ ते ४ दरम्यान ‘संविधान आणि शिक्षण’ या चर्चासत्रात प्रा. रंजना आवटे मार्गदर्शन करणार असून अध्यक्षस्थानी निश्चय एम. एस. असतील.
तिसरे चर्चासत्र व समारोप : या संमेलनाच्या अखेरच्या चर्चासत्रात सायंकाळी ४ ते ५ दरम्यान ‘आजचे वास्तव आणि भारतीय संविधान’ या विषयावर न्यायमूर्ती बी. जे. कोळसे-पाटील मार्गदर्शन करणार असून अध्यक्षस्थानी विद्रोही संस्कृत चळवळ, संविधान बचाव आंदोलन कराड-सातारचे अध्यक्ष पार्थ पोळके असणार आहेत.
आवाहन : तरी या संमेलनास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समितीतर्फे अध्यक्ष पॅंथर अशोक भोसले, उपाध्यक्ष मुकुंद माने, उपाध्यक्ष सुरेश लादे, महासचिव दत्तात्रय दुपटे, सचिव विजय काटरे, कोषाध्यक्ष विजय थोरवडे व सहकोषाध्यक्ष राहुल भोसले यांनी केले आहे.
