प्राचार्य डॉ. जे. एस. पाटील; बापूजी साळुंखे महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा
कराड/प्रतिनिधी : –
आयुष्यात फक्त पैसा नव्हे; तर समाधान महत्त्वाचे असते. जीवन जगण्याचा सुकर मार्ग म्हणजे समाधान आहे. यासाठी आपली माणुसकी हरवू देऊ नका, समाजमन जपा. कारण माणुसकी व समाजसेवा ही सर्वोच्च नीतिमूल्ये आहेत, असे मत प्राचार्य डॉ. जे. एस. पाटील यांनी व्यक्त केले.
माजी विद्यार्थी मेळावा : येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात स्वामी विवेकानंद सप्ताहादरम्यान माजी विद्यार्थी संघातर्फे आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. यावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रमोद सुकरे, उपाध्यक्ष माणिक डोंगरे, संघाचे पदाधिकारी नितीन ढापरे, बालिश थोरात, संघटक वैभव डवरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाविद्यालयास नवसंजीवनी : माजी विद्यार्थी मेळावा हा अनुभवांचा खजिना असतो, असे सांगत प्राचार्य जे. एस. पाटील म्हणाले, माजी विद्यार्थी हा महाविद्यालयाचा मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावतो. भूतकाळातील अनुभव भावी पिढीला देणे महत्त्वाचे असल्याने असे मेळावे महाविद्यालयास नवसंजीवनी देत असल्याचे त्यांनी सांगितले.
कृतज्ञभाव प्रेरणादायी ठरेल : या मेळाव्याने महाविद्यालयाच्या लौकिकात भर पडली असल्याचे सांगत प्राचार्य डॉ. सतीश घाडगे म्हणाले, माजी विद्यार्थी संघ महाविद्यालयाच्या व विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी सदैव अग्रेसर असतो. माजी विद्यार्थ्यांचा हा ऋणानुबंध व शिक्षकांप्रति असलेला कृतज्ञभाव आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. महाविद्यालयाच्या इतिहासात या मेळाव्याचे महत्व अधोरेखित होईल.
मनोगत : यावेळी इचलकरंजी येथील प्राध्यापक विलास पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी उद्घाटन सत्रामध्ये प्रमुख पाहुणे व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रमोद सुकरे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीबाबत कौतुक केले. तसेच माजी विद्यार्थ्यांची आणखी जबाबदारी वाढली असल्याचे सूचित केले.
अमूल्य योगदान : प्रास्ताविक माजी विद्यार्थी वैभव डवरी, सूत्रसंचालन माजी विद्यार्थी प्रेरणा धुमाळ, संतोष जाधव यांनी आभार मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी संघ सर्व सदस्य, प्रा. विश्वनाथ सुतार, प्रा. संभाजी पाटील, तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापिका, प्रशासकीय कर्मचारी यांचे योगदान लाभले. या मेळाव्यास बहुसंख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.
