अनिल कवडे; कराडमध्ये तिसरी सहकार परिषद उत्साहात, विद्यार्थी, शिक्षक, संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
कराड/प्रतिनिधी : –
सहकाराला आता नाविन्याची जोड द्यायला हवी. संस्थांनी माहिती तंत्रज्ञानाची कास धरून गतिमान व्हायला हवे. सहकारी संस्थांनी व्यवहार म्हणून नव्हे, तर सद्भावना म्हणून काम करावे. त्यासाठी सभासदांना विविधांगी सेवा देता आली पाहिजे. किंबहुना सहकारातून पर्यायी अर्थव्यवस्था उभी राहायला हवी, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणचे (पुणे) आयुक्त अनिल कवडे यांनी केले.
तिसरी सहकार परिषद : येथील कराड अर्बन बँकेच्या शताब्दी सभागृहात मळाई ग्रुप, मलकापूर मधील सहकारी संस्था व कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्य विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय सहकार परिषद २०२५ च्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
मान्यवर : परिषदेच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्य विचार मंचचे अध्यक्ष प्रा.डॉ. शरद शेटे होते. यावेळी शेतीमित्र अशोकराव थोरात, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारचे संजय कुमार सुद्रिक, सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था, कराडच्या श्रीमती अपर्णा यादव, मळाईदेवी पतसंस्थेचे चेअरमन अजितराव थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

नाविन्याला प्रोत्साहन द्या : राज्यात चढ्या दराने खते, औषधे, बी-बियाणांची विक्री होत असेल, तर त्याच्या मुळाशी जाऊन सहकारी संस्थांनी सेवा दिली पाहिजे आणि या संस्था जपण्यासाठी सभासदांनीही आपले योगदान दिले पाहिजे, असे सांगत श्री कवडे म्हणाले, सहकारी संस्थांमध्ये चांगली सादरीकरणे व्हायला हवीत, नाविन्याला प्रोत्साहन द्यायला हवे. पतसंस्थांच्या तालुकास्तरीय संघटनांनी बैठका घेऊन विविध सहकारी उपक्रमांची माहिती द्यावी, त्याची अंमलबजावणी करावी.
गावाला विकासकेंद्र बनवा : सहकारी संस्थांच्या माध्यमातून गावला विकासकेंद्र बनवावे, असे सांगत श्री कवडे म्हणाले, शासन निर्णय व विविध बहुपयोगी योजना कागदावरच न राहता त्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत, यासाठी प्रयत्नशील रहावे. वस्तू आणि सेवांचा दर्जा उच्च असावा. सहकारी संस्थांनी एनपीए 0 टक्के कसा राखता येईल, त्यादृष्टीने प्रयत्न करावेत.
…त्यांचा आदर्श घ्या : अनेक गावांत सोसायट्यांच्या माध्यमातून ड्रोनद्वारे औषध फवारणी, अल्प दरात दळण, जेनरीक औषधे, डिजिटल सेवा सुविधा, दिल्या जात आहेत. अशा अनेकविध उपक्रम राबवावेत. त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन श्री कवडे यांनी केले.
शिवाजी महाराज आणि संतांच्या विचारांचा अवलंब करा : शिक्षणाला प्रामाणिकपणाची जोड हवी. तसेच शिक्षणाने संस्कार, मूल्ये, सहकाराबद्दलची आस्था आणि अस्मिता आली पाहिजे, असे सांगताना श्री कवडे म्हणाले, सहकार वाढवायचा असेल, तर सहकारातील भावना, विचार जपायला हवेत. सहकार क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम होणे गरजेचे आहे. सहकारचे शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून सहकाराची मूल्ये रुजवणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक संतांनी सहकाराचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे, त्या विचारांच्या अवलंबून करत सहकारी संस्थांनी लोककल्याणकारी कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
…तर सहकार वृद्धिंगत होईल : सहकार क्षेत्रातील अर्थकारण यावर सविस्तर विवेचन केले. तसेच सहकार आणि अर्थशास्त्राशी निगडीत प्रत्येक घटकाने सर्वोत्तम योगदान दिल्यास सहकार आणखी वृद्धिंगत होईल, असे मत प्रा. डॉ. शरद शेटे यांनी व्यक्त केले. तसेच अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना असलेल्या करिअरच्या संधी याबाबतही मार्गदर्शन केले.
उपस्थिती : कार्यक्रमाला मळाई ग्रुपशी निवडीत सर्व संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी व शिक्षक, तसेच तालुक्यातील अनेक महाविद्यालयांमधील अर्थशास्त्राचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृत्रिम बुद्धिमत्ता असंवेदनशील
आता सर्वच क्षेत्रांसमोर कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) आव्हान आहे. माणसाला बुद्धिमत्ता, संवेदना आणि भावना आहेत. परंतु, यंत्रमानवाला त्या नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्ता फक्त शब्द प्रपंच निर्माण करू शकते. त्या शब्दांना केवळ अर्थ असतील, मात्र भावना नसतील. गीता आणि ज्ञानेश्वरीतील अनेक अभंगांची उदाहरणे देत त्यांनी त्यातील प्रत्येक शब्दामागे असलेले अनेकविध अर्थ आणि त्यामागील भावना, विचारांचा खोली श्री कवडे यांनी नमूद केली.
महाराष्ट्रात सव्वादोन लाख सहकारी संस्था
सावकारी पाशातून जनतेला मुक्त करण्याच्या उद्देशाने सहकाराचा जन्म झाला. त्यानंतर महाराष्ट्राने सहकारात मोठी झेप घेतली. देशात सर्वाधिक म्हणजेच तब्बल सव्वादोन लाख सहकारी संस्था महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे सहकार क्षेत्राचे दायित्व, जबाबदारी आणि सहकार ऊर्जेतावस्थेत आणून त्याला त्याचा मानदंड निर्माण करणे, ही राज्याची, प्रत्येक सहकारी संस्थेची आणि त्याच्या प्रत्येक घटकाची जबाबदारी असल्याचे मत श्री कवडे यांनी व्यक्त केले.
