आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांचा इशारा; महामार्गाच्या कामासंदर्भात आढावा बैठक
कराड/प्रतिनिधी : –
कोल्हापूर नाका येथील जाधव आर्केडजवळ झालेल्या अपघातात एका महिला डॉक्टर युतीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बाब अत्यंत खेदजनक आहे. या पार्श्वभूमीवर आपण संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली आहे. तसेच त्यांना प्रत्येक दिवसाच्या कामाचा अहवाल तहसीलदारांना सादर करण्याचा सूचनाही दिल्या आहेत. यादरम्यान एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिल्या.
आढावा बैठक : येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी महामार्ग विस्तारीकरण उड्डाणपुलाचे काम आणि वाढत्या दुर्घटना या अनुषंगाने सर्व विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आ. डॉ. भोसले यांनी सर्व अधिकार्यांकडून महामार्गाच्या कामाचा व अपघातप्रवण क्षेत्रांचा आढावा घेतला. याप्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांना सक्त सूचना देताना ते बोलत होते.
उपस्थिती : बैठकीस तहसीलदार कल्पना ढवळे यांच्यासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आदानी व डी. पी. जैन कंपनीचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, कराड व मलकापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.
मागील कामांचा आढावा : पंधरा दिवसांपूर्वी महामार्ग विस्तारीकरण कामाच्या संदर्भात, तसेच खड्डेमुक्त रस्ता करण्यासंदर्भात एक बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये रस्त्यांवरील पडलेले सर्व खड्डे बुजविण्याच्या बाबतीत आवश्यक सूचना संबंधित विभागांना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पंधरा दिवसांनी सदरच्या कामाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आल्याचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले. तसेच यामध्ये संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांकडून त्या त्या कामांसंदर्भातील सविस्तर आढावा घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
काँक्रीट प्लॅन तयार : यामध्ये महामार्ग विस्तारकरण उड्डाणपूल उभारणी कामादरम्यान काही ठिकाणी दुभाजक, तसेच रंबलर उभारण्याची गरज असून काही ठिकाणी रिफ्लेक्टर लावणे गरजेचे आहे. याची सविस्तर माहिती घेऊन याबाबत एक काँक्रीट प्लॅन तयार करण्यात आल्याचे आ. डॉ. भोसले यांनी सांगितले.

तहसीलदारांना दररोज अहवाल सादर करा : सदर काँक्रीट प्लॅनमुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी आशा आ. डॉ. भोसले यांनी व्यक्त केली. तसेच त्याचबरोबर अनेक ठिकाणची पाहणी करून सात दिवसांच्या आत कोणत्याही परिस्थितीत सर्व कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने एक नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार दररोज संध्याकाळी सायं. ५ वाजता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आदानी व डी. पी. जैन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपण आज कोणकोणती कामे पूर्ण केली? यासंदर्भात तहसीलदारांना अहवाल सादर करायच्या सूचना आपण संबंधितांना दिल्या आहेत.
संबंधित अधिकाऱ्याची जबाबदारी : सदर कामे अपूर्ण राहिल्यास, तसेच अपघात होऊन त्यामध्ये एखाद्याचा बळी गेल्यास संबंधित जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा सूचना वजा इशाराही आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी यावेळी दिला.
मनमानी खपवून घेणार नाही : या सर्व कामांच्या दर्जाबाबत आणि जबाबदारीबाबत संबंधित ठेकेदार, कंपनी व अधिकाऱ्यांची कोणत्याही बाबतीत मनमानी खपवून घेतली जाणार नाही, असेही आ. डॉ. भोसले यांनी बजावले आहे.
