शासकीय सुविधा व योजनांचा मिळणार लाभ; नागरिकांनी अर्ज करण्याचे प्रशासनाचे आवाहन
कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार तालुक्यातील नागरिक व जनतेच्या तक्रारी/अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिन्याचे तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरावर लोकशाही दिन राबविला जातो. त्यानुसार सोमवार (दि. 20) रोजी सकाळी 11 वाजता उपविभागीय अधिकारी, कराड यांच्या अध्यक्षतेखाली कराड तहसील कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजित करण्यात आले आहे.
तक्रारींचे निवारण, माहिती व लाभ : या उपक्रमात महसूल विभागातील वारस नोंदी, फेरफार नोंदी, रस्ता अडथळे, नवीन शिधापत्रिका देणे, शिधापत्रिकेतील नाव कमी करणे, नाव वाढवणे, नाव कमी करणे, दुबारा शिधापत्रिका देणे, तसेच विशेष सहाय्य योजनेंतर्गत श्रावणबळ, संजय गांधी, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा, दिव्यांग, राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना, स्वातंत्रय सैनिक आणीबाणी आदी योजनांसह विविध प्रकारचे शैक्षणिक दाखले, आधार कार्ड, लोकसंखेचा दाखला व इतर तत्सम महसूल विभागाशी संबंधित सर्व सेवा/तक्रारी, तालुकास्तरावरील इतर सर्व विभागांकडील सेवा/तक्रारीच्या अनुषंगाने अर्ज स्वीकृत करुन सदर अर्ज संबंधित विभागाकडे पाठवून त्यावर सत्वर कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागातील कार्यालय प्रमुखांना निर्देश देण्यात येणार आहेत.
अर्जाचा नमुना : यासाठी करायच्या अर्जाचा नमुना, फौजदारी संकलन तहसील कार्यालयात विनामुल्य उपलब्ध करण्यात आला आहे. तरी कराड तालुक्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील नागरिक व जनतेने आपल्या तक्रारींसह लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी श्रीमती कल्पना ढवळे यांनी केले आहे.
