स्वत्वाची जाणीव झाल्यास माणूस मोठा होतो : सत्काराला उत्तर देताना प्रा. अशोक चव्हाण म्हणाले, 60 – 70 वर्षांपूर्वी मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन, हाल अपेष्टा सोसत उद्योग, व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केलेले अनेक लोक आज कराड, पाटण सारख्या ग्रामीण भागात आहेत. माणसाला जेव्हा स्वत्वाची जाणीव होते, तेव्हा माणूस मोठा होतो. ही त्याचीच उदाहरणे आहेत. अशा माणसांचा शोध घेऊन त्यांचा संघर्ष शब्द रूपात मांडायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी पाटील बंधूंकडे व्यक्त केली.
सर्वसमावेशक भूमिका घेऊन वाटचाल करा : तत्कालीन प्रस्थापितांच्या विरोधात बहुजन समाजातील पत्रकारांना कशा प्रकारचा संघर्ष करावा लागला, यावरही प्रकाशझोत टाकत पूर्वीची पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता यावर बोलके भाष्य केले. तसेच मुद्रित माध्यमांसमोर असलेली आव्हाने सांगताना इलेक्ट्रिक व सोशल माध्यमांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक कौशल्ये पत्रकारांनी आत्मसात करावीत. त्याचबरोबर पत्रकारांनी सर्वसमावेशक भूमिका घेऊन वाटचाल केल्यास भावी पिढीही त्यांचे योगदान लक्षात ठेवेल, अशी अपेक्षाही प्रा. चव्हाण यांनी व्यक्त केली.
पत्रकारांचे सहकार्य राहील : मनोगतात सतीश मोरे यांनी कराडच्या खाद्य संस्कृतीचा एक घटक म्हणून नावारूपाला येणाऱ्या एन.पी.फिश कंपनीला शुभेच्छा देत त्यांना पत्रकारांकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.
प्रास्ताविक व आभार : प्रास्ताविक नितीन ढापरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद तोडकर यांनी, तर सुनील पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने पत्रकारांची उपस्थिती होती.
संघर्षनायकांचा संघर्ष शब्दरूपात मांडणार
ज्येष्ठ पत्रकार प्रा. अशोक चव्हाण यांनी मांडलेल्या कल्पनेवर बोलताना उद्योजक सुनील पाटील म्हणाले, कराड व पाटण सारख्या ग्रामीण भागातून मुंबईला पायी चालत जात, परिस्थितीशी संघर्ष करत उद्योग, व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली. अशा संघर्ष नायकांचा शोध घेऊन त्यांच्या संघर्ष शब्द रूपात मांडण्याचा प्रयत्न करणार असून पुढील पत्रकार सन्मान सोहळ्यात या पुस्तकाचे नक्कीच प्रकाशन करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच हॉटेल एन. पी. फिशचा हॉल पत्रकार व त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमांसाठी मोफत देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.