‘कृष्णा’चा माहितीपट राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात तृतीय

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

पुणे येथे नुकत्याच झालेल्या 13 व्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात कृष्णा विश्व विद्यापीठाची प्रस्तुती असलेल्या ‘राईट टू क्लिन एन्व्हायर्मेन्ट’ या माहितीपटाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांच्या हस्ते विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक तथा या माहितीपटाचे दिग्दर्शक डॉ. बाळकृष्ण दामले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सव : आरोग्य जागृतीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या पुणे येथील पी. एम. शाह फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षी आरोग्य समस्यांवरील चित्रपटांच्या राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या 13 व्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवासाठी विविध भारतीय भाषांमधून अनेक विषयांवरचे सुमारे ३४ लघुपट व माहितीपट फाऊंडेशनकडे प्राप्त झाले होते. यामध्ये कृष्णा विश्व विद्यापीठाने तयार केलेल्या ३ लघुपटांचा व एका माहितीपटाचा समावेश होता. 

‘राईट टू क्लिन एन्व्हायर्न्मेंट’ या माहितीपट तृतीय : महोत्सवात कृष्णा विश्व विद्यापीठ प्रस्तुत आणि डॉ. बाळकृष्ण दामले दिग्दर्शित ‘राईट टू क्लिन एन्व्हायर्न्मेंट’ या माहितीपटाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. आरोग्यदायी जीवनासाठी स्वच्छ पर्यावरण हा प्रत्येकाचा हक्क आहे, याबाबतची जागृती या माहितीपटाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. महोत्सवाच्या समारोप सत्रात सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांच्या हस्ते माहितीपटाचे दिग्दर्शक डॉ. बाळकृष्ण दामले यांना सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी महोत्सवाचे आयोजक ॲड. चेतन गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

डिप्रेशन/एन्झायटी सांगण्याची फॅशन : यावेळी बोलताना सौ. प्रभुलकर म्हणाल्या, आरोग्य हा अत्यंत गंभीर विषय असून, आरोग्यावर आधारित चित्रपट व माहितीपट निर्माण होणे महत्त्वाचे आहे. एखादा संदेश द्यायचा असल्यास ती गोष्टीच्या माध्यमातून चिरकाल मनात राहते. मानसिक आरोग्य हा कळीचा मुद्दा झाला आहे. ‘डिप्रेशन’ आणि ‘एन्झायटी’ हे शब्द माझ्या पिढीला माहितीही नव्हते. मात्र, आज हे ‘मला डिप्रेशन किंवा एन्झायटी आहे’ हे सांगण्याची जणू फॅशनच आहे. हे सारे गंभीर असून, यामागील कारणे शोधणे गरजेचे आहे. समाजमाध्यमे ही मानसिक आरोग्य बिघडण्याचे सर्वांत मोठे कारण आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

कलाकार व तंत्रज्ञांचे आभार : या यशाबद्दल माहितीपटाच्या निर्मितीप्रक्रियेत सहभागी झालेल्या कलाकार व तंत्रज्ञांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. या यशाबद्दल कृष्णा विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, शैक्षणिक व मानांकन विभागाचे प्रधान सल्लागार डॉ. प्रवीण शिंगारे, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा आणि कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांनी लघुपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!