कराड/प्रतिनिधी : –
कराड तालुका पंचायत समितीच्या कार्यालयाची नवी सुसज्ज प्रशासकीय इमारत साकारण्यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले प्रयत्नशील आहेत. या अनुषंगाने त्यांनी श्री दैत्यनिवारणी देवी मंदिर परिसरातील प्रस्तावित जागेची शासकीय अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. तसेच या नव्या इमारतीचा कृती आराखडा ताबडतोब तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
सुसज्ज इमारत उभी करण्याचा संकल्प : कराड तालुका हा लोकसंख्येच्या आणि कामकाजाच्या दृष्टीने मोठा तालुका आहे. कराडमधील सध्याची पंचायत समितीची इमारत जुन्या धाटणीची आहे. शासकीय कामांसाठी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकं येतात. पण अपुऱ्या जागेमुळे लोकांची मोठी गैरसोय होताना दिसून येते. अशावेळी तालुक्यातील नागरिकांना शासकीय सेवा सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पंचायत समितीची प्रशासकीय इमारत सुसज्ज असणे गरजेचे आहे. यादृष्टीने पंचायत समितीशी निगडित सर्व कार्यालये एकाच ठिकाणी यावीत आणि त्या माध्यमातून नागरिकांना सुलभपणे सर्व शासकीय सेवाचा लाभ घेता यावा, यासाठी कराड पंचायत समितीची नवी सुसज्ज प्रशासकीय इमारत उभी करण्याचा संकल्प कराड दक्षिण विधानसभेचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केला आहे.
जागेची पाहणी : या पार्श्वभूमीवर नव्या इमारतीच्या उभारणीसाठी कराड येथील श्री दैत्यनिवारणी देवी मंदिराशेजारील जागेची पाहणी आ. डॉ. भोसले यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत केली. याठिकाणी पंचायत समितीची सुसज्ज व सर्वसोयींनीयुक्त प्रशासकीय इमारत उभारल्यास पंचायत समितीचे कामकाज अधिक गतिमान होईल. तसेच नागरिकांना उत्तम सेवा मिळू शकतील, असा विश्वास आ. डॉ. भोसले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
पाठपुरावा करणार : भविष्यातील कामकाजाचा अंदाज लक्षात घेऊन, या नव्या इमारतीच्या उभारणीसाठी योग्य कृती आराखडा तातडीने तयार करण्याच्या सूचना आ. डॉ. भोसले यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच नव्या इमारतीचा आराखडा तयार करताना त्यात नैसर्गिक सूर्यप्रकाश, कामकाजात सुलभता यावी यापद्धतीने इमारतीची अद्ययावत रचना, पार्किंगची व्यवस्था यासह अन्य अनुषंगिक सोयीसुविधांचा अंतर्भाव करावा, अशा सूचनाही आ. डॉ. भोसले यांनी केल्या. नव्या इमारतीच्या आराखडा शासनाला सादर करुन, याप्रश्नी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करुन लवकरात लवकर कराड पंचायत समितीची नूतन सुसज्ज इमारत साकारण्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
उपस्थित मान्यवर : याप्रसंगी गटविकास अधिकारी प्रताप पाटील, जि. प. कार्यकारी अभियंता अमर नलवडे, आर्किटेक्ट तुषार पाटील, माजी नगरसेवक हणमंतराव पवार, सूरज शेवाळे यांच्यासह अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.