मार्गशीर्ष महिन्यातील महात्म्य; वर्षातून एकदा होते विशेष महापूजा
कराड/प्रतिनिधी : –
येथील दैत्यनिवारीणी देवीच्या पूजेला नवरात्रोत्सवासह मार्गशीर्ष महिन्यातही विशेष महत्त्व आहे. मार्कशीर्ष महिन्याच्या पहिल्या मंगळवारी (दि. 10 रोजी) देवीची दही भाताने विशेष पूजा बांधण्यात आली होती. वर्षातून एकदा होणाऱ्या या महापूजेला विशेष महत्त्व असल्याने आजच्या दिवशी देवीच्या पूजेसाठी व दर्शनासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती.
कोयनामाई : दक्षिण काशी म्हणून लौकिक असलेल्या कराडनगरीच्या प्रवेशद्वारावरील दैत्यनिवारीणी देवीला कोयनामाई असेही संबोधले जाते. कोयना नदीकाठी देवीचे मंदिर असून सण, उत्सव काळासह दर मंगळवार आणि शुक्रवारी देवीच्या दर्शनाला भाविक, भक्तांची मोठी गर्दी होत असते.
नवरात्रोत्सवामध्ये विशेष महत्त्व : या देवीच्या पूजेला नवरात्रोत्सवामध्ये विशेष महत्त्व असते. यावेळी नऊ दिवस विविध रूपांमध्ये देवीची महापूजा बांधली जाते. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. या उत्सवात महिलांसह भावी भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. कराड परिसरासह सातारा जिल्हा आणि महाराष्ट्रभरातही या देवीची मोठी महती आहे.
मार्गशीर्ष महापूजा : मार्कशीर्ष महिन्यात दर गुरुवारीही या देवीच्या पूजेसाठी व दर्शनासाठी महिलांची मोठी गर्दी होत असते. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या मंगळवारी दैत्यनिवारीणी देवीच्या मूर्तीवर दही भाताचा लेप देऊन विशेष महापूजा बांधली जाते. वर्षातून केवळ एकदाच देवीची अशा प्रकारची विशेष पूजा बांधली जात असल्याने या पूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या मंगळवारी देवीची या रूपात पूजन करण्यासाठी, तसेच दर्शन घेण्यासाठी महिलांची मोठ्या संख्येने गर्दी होत असते.
पुजा व दर्शन : मंगळवारी (दि. 10 रोजी) सकाळपासून दैत्यनिवारीणी देवीच्या पूजेसाठी महिलांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.
मार्गशीर्ष महिन्यातील पूजेचे महत्व
मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी देवीच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात देवीचे पूजन केल्यास भक्तांवर देवीची कृपा होते. तसेच त्यांना सुख, शांती, ऐश्वर्य, समृद्धी प्राप्त होते. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी देवीसह कराडमधील उत्तरालक्ष्मी, कृष्णामाई आणि दैत्यनिवारीणी / कोयनामाई देवीच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे.