‘कृष्णा’च्या चार लघुपटांची राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात निवड

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

पुणे येथे 20 व 21 डिसेंबरला होणार प्रदर्शित; पी. एम. शाह फाऊंडेशनतर्फे आयोजन

कराड/प्रतिनिधी : – 

पुणे येथे होणाऱ्या 13 व्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात कृष्णा विश्व विद्यापीठाच्या 4 लघुपटांची निवड झाली आहे. या लघुपटांचे दिग्दर्शन कृष्णा विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. बाळकृष्ण दामले यांनी केले असून, याचे प्रदर्शन 20 व 21 डिसेंबर रोजी पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात मान्यवरांच्या उपस्थितीत केले जाणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सव : आरोग्य जागृतीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या पुणे येथील पी. एम. शाह फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षी आरोग्य समस्यांवरील चित्रपटांच्या राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या 13 व्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवासाठी विविध भारतीय भाषांमधून अनेक विषयांवरचे लघुपट फाऊंडेशनकडे प्राप्त झाले होते. यामधून कृष्णा विश्व विद्यापीठाने तयार केलेल्या 4 लघुपटांची निवड यंदाच्या महोत्सवासाठी करण्यात आली आहे.

लघुपटांचे दिग्दर्शन : ‘शूर महिला कोविड योद्धा’, ‘बी अ गुड समरिटन’, ‘राईट टू क्लिन’ आणि ‘द लिस्ट’ असे हे चार लघुपट असून, या चारही लघुपटांचे दिग्दर्शन कृष्णा विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. बाळकृष्ण दामले यांनी केले आहे. ‘द लिस्ट’ या लघुपटाचे सहदिग्दर्शन डॉ. शेखर कुलकर्णी यांनी केले असून, यामध्ये ख्यातनाम अभिनेते डॉ. मोहन आगाशे विशेष भूमिकेत आहेत.

लघुपटांचे प्रदर्शन : पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात 20 व 21 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात या लघुपटांचे प्रदर्शन केले जाणार आहे. नागपूर येथील प्रख्यात न्यूरोलॉजिस्ट पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांच्या हस्ते 20 डिसेंबरला या महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. तर 21 डिसेंबर रोजी सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप व पुरस्कार वितरण सोहळा रंगणार आहे.

दिग्दर्शक डॉ. बाळकृष्ण दामले. 

कलाकार व तंत्रज्ञांचे अभिनंदन : कृष्णा विश्व विद्यापीठाच्या 4 लघुपटांची निवड एकाचवेळी राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवासाठी झाल्याने, याबद्दल सहभागी कलाकार व तंत्रज्ञांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. या यशाबद्दल कृष्णा विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, शैक्षणिक व मानांकन विभागाचे प्रधान सल्लागार डॉ. प्रवीण शिंगारे, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा आणि कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांनी लघुपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!