कराड/प्रतिनिधी : –
येथील श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दिला जाणारा सन 2021-22 “यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार” सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांना मरणोत्तर समर्पित केला जाणार असून कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन अँड मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. सुरेश भोसले स्वीकारणार आहेत. तसेच सन 2022-23 चा हा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार डॉ. रविंद्र बेडकिहाळ (फलटण) यांना प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळा : रविवार, दि. 15 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता स्व. सौ. वेणुताई चव्हाण सांस्कृतिक सभागृह कराड येथे हा सोहळा होणार आहे. अध्यक्षस्थान सिक्कीमचे माजी राज्यपाल माजी खासदार श्रीनिवास पाटील भूषविणार आहेत.
प्रमुख अतिथी : या सोहळ्यासाठी राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माजी आमदार बाळासाहेब पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून शिवम् प्रतिष्ठानचे मार्गदर्शक इंद्रजित देशमुख (काकाजी) विशेष आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
आतापर्यंतचे मानकरी : स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी व श्री कालिकादेवी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सुरू केलेल्या या उपक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, रानकवि ना. धो. महानोर, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांची नाम संस्था – पुणे, शांतीलाल मुथ्था (पुणे), इंद्रजित देशमुख (काकाजी), सिक्कीमचे माजी राज्यपाल खा. श्रीनिवास पाटील, आ. स्व.पी.डी. पाटील साहेब (मरणोत्तर), पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील (मरणोत्तर) यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कार्य व सेवेचा सन्मान : स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सहकार व आरोग्य सेवेचा सन्मान म्हणून हा पुरस्कार त्यांना समर्पित करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ पत्रकार डॉ. रविंद्र बेडकिहाळ यांच्या 56 वर्षांतील पत्रकारितेचा व त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
आवाहन : या सोहळ्यास संस्थेचे सभासद व परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान (सावकार), चेअरमन राजन वेळापुरे, समन्वयक प्रा. अशोककुमार चव्हाण, कार्यलक्षी संचालक विवेक वेळापुरे व संचालक मंडळ सदस्यांनी केले आहे.