कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध नागरी समस्या तातडीने सोडविण्यासाठी ठोस कृती आराखडा सादर करा. तसेच आगाशिवनगर, पाटण कॉलनी, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टी वासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिले.
शासकीय आढावा बैठक : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील विविध शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी विविध विभागांच्या कामकाजाचे स्वरुप समजावून घेत अधिकाऱ्यांना विविध सूचना करताना ते बोलत होते.
पक्के घर मिळवून देण्याची ग्वाही : प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून स्वत:चे पक्के घर मिळविणे हा या नागरिकांचा हक्क असल्याचे सांगत आमदार डॉ. भोसले म्हणाले, त्यामुळे येत्या 5 वर्षांत एकही माणूस झोपडपट्टीत न राहता, त्याला स्वत:च्या हक्काचे पक्के घर मिळवून देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून लागेल ती मदत करण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
देशात कराड शहर नावारुपाला आणणार : कराड शहर हे देशाच्या नकाशावर सर्वांत देखणे शहर म्हणून नावारुपाला आणण्याचे माझे उद्दिष्ट असल्याचे सांगत आमदार डॉ. भोसले म्हणाले, त्यादृष्टीने शहराचा पुढील 25 वर्षांचा विकास आराखडा निश्चित करण्याची गरज असून, याबाबत काही ख्यातनाम नगररचनाकारांसमवेत माझी चर्चा सुरु आहे.
प्रत्येक विभागाची स्वतंत्र बैठक घेणार : बैठकीत विविध प्रश्नांवर बोलताना आमदार डॉ. भोसले म्हणाले, विविध शासकीय कार्यालयांच्या इमारतींची उभारणी व डागडुजी, पोलिसांसाठी घरांची उभारणी, राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या कामामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, ग्रामीण रस्ते व पाणंद रस्त्यांची कामे, मलकापूर येथे स्वतंत्र पोलिस स्टेशनची उभारणी, दीर्घकाळ रखडलेली मलकापूर नगरपरिषदेच्या इमारतीचे काम पूर्णत्वास नेणे, तांडा वस्ती व बुद्ध विहारांसाठी निधी, शाळा सुधारणेबाबत उपाययोजना, कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी आदी प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करुन, या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तातडीने प्रत्येक विभागाची स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पोलीस उप अधीक्षक डॉ. अमोल ठाकूर, तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, कराडचे मुख्याधिकारी शंकर खंदारे, मलकापुरचे मुख्याधिकारी प्रताप कोळी, उपविभागीय कृषी अधिकारी समीर पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रमोद चौधरी, टेंभू उपसा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार, गटशिक्षणाधिकारी बिपीन मोरे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृष्णा – कोयनेकाठी ‘रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट’
‘साबरमती रिव्हरफ्रंट’ प्रकल्पाच्या धर्तीवर कराड शहरातही कृष्णा-कोयना नदीकाठी ‘रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट’ साकारण्याचा माझा मानस आहे. लोकेनेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारक स्थळाचे सुशोभीकरण करुन, या परिसरात पर्यटनाला चालना मिळेल, असे विविध प्रकल्प राबिवण्याची गरज आहे. यामध्ये लेसर शो, बोटींगची सोय, वीर मारुती मंदिराचा जिर्णोद्धार, ओपन थिएटर व सांस्कृतिक भवनाची उभारणी असे अनेक नाविण्यपूर्ण प्रकल्प साकारण्याचे उद्दिष्ट्य असल्याचे आमदार डॉ. भोसले यांनी सांगितले.
पार्किंग आराखडा तयार करा
शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठीही व्यापक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगत आमदार डॉ. भोसले म्हणाले, या अनुषंगाने हायड्रोलिक पार्किंग किंवा मल्टिस्टोरेज पार्किंग व्यवस्थेचा विचार करणे शक्य असून, त्याबाबतचा निश्चित असा कृती आराखडा प्रशासनाने तयार करावा. या प्रश्नांबाबत प्रशासनाने प्रस्ताव तयार करुन द्यावेत, सरकारकडून निधी आणण्याची जबाबदारी माझी असेल, अशी ग्वाहीही आ. डॉ. भोसले यांनी दिली.