यशवंत कृषी प्रदर्शनाची मंडप उभारणी वेगाने

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रथमच विना खांबाचा मंडप; 6 डिसेंबरपासून सुरू होणार कृषी मेळा 

कराड/प्रतिनिधी : –

शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने दरवर्षी भरविण्यात येणारे यशवंत कृषी प्रदर्शन येत्या 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर रोजी सुरू होत आहे. कृषी प्रदर्शनाचे यंदा 19 वे वर्ष असून, कृषी व औद्योगिक स्तरावरील कृषी मेळा सहा डिसेंबरपासून सर्वांना अनुभवता येणार आहे. प्रदर्शनाच्या तयारीसाठी उभारल्या जाणाऱ्या मंडपाची उभारणी वेगाने सुरू असून, प्रथमच विना खांबाच्या मंडपात हे प्रदर्शन भरणार आहे. मंडप उभारणीचा शुभारंभ रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला होता.

शासकीय विभागाचे सहकार्य : शासन कृषी विभागाच्या सर्वोतोपरी सहकार्यातून हे प्रदर्शन होणार आहे. कृषी विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समिती, तसेच पशुसंवर्धन विभागाचे याकामी मोठे सहकार्य लाभत आहे. जनावरांच्या बाजार तळावर प्रदर्शनाच्या मंडपाची उभारणी केली जात आहे. पाच विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा हा मंडप आहे. यंदा प्रथमच विना खांबावर हा मंडप उभारला जात आहे.

बिनखांबी मंडप : हा मंडप पिलरलेस (बिनखांबी) डोममध्ये वॉटरप्रुफ असणार आहे. त्यामध्ये 400 स्टॉल, पशू पक्षांचे स्वतंत्र दालन आहे. आरोग्य विभाग व नवनवीन तंत्रज्ञान दाखवणारे स्टॉल असतील. संपूर्ण मंडपात हवा खेळती राहणार आहे. शेतकऱ्यांना समोर ठेवून प्रदर्शन भरवले जाणार आहे.

शासकीय स्टॉल : पहिल्या तीन ते चार विभागातील मंडपात शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती कृषी विभागातील कृषी, तंत्रज्ञान, अवजारे यामधील बदलत्या बाबींचा आढावा घेणारे स्टॉल असणार आहेत. त्याचबरोबर खते, बी – बियाणे, कृषी निविष्ठा आदी विभागाची माहिती देणारे स्टॉल आहेत. तसेच कृषी औद्योगिक क्षेत्रातील नवनवीन अवजारे, यंत्रे यांची माहिती देणारे स्टॉल यावेळी पहायला मिळणार आहेत.

सर्व स्टॉल बुक : तांदूळ महोत्सव, जनावरांचे प्रदर्शन, अमेझॉन पार्क, तसेच महिला बचतगटांचे स्टॉल सहभागी झाले आहेत. प्रदर्शनात विविध प्रकारच्या सुमारे चारशे स्टॉलनी सहभाग नोंदवला आहे. हे सर्व स्टॉल बुक झाले असून, यंदा प्रदर्शनाच्या वेळेत बदल होवूनही सर्व पातळीवरून प्रदर्शनास उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. डायनॅमिक इव्हेंटच्या वतीने धीरज तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

मोलाचे परिश्रम : याकामी सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, संचालक नितीन ढापरे, राजेंद्र चव्हाण, जगन्नाथ लावंड, संभाजी चव्हाण, विजयकुमार कदम, सतीश इंगवले, जयंतीलाल पटेल, सर्जेराव गुरव, गणपत पाटील, श्रीमती इंदिरा जाधव – पाटील, सौ. रेखा पवार, जगदीश जगताप, दयानंद पाटील, मानसिंगराव जगदाळे, सोमनाथ जाधव, उध्दव फाळके, प्रभारी सचिव आबासाहेब पाटील, सर्व कर्मचारी, शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी याकामी परिश्रम घेत आहेत.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!