मतदार का नाराज झाले? मी कुठे कमी पडलो..! 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले मत; कराडकरांची सेवा करतच राहणार 

कराड/प्रतिनिधी : –

कराड दक्षिणमधील जनतेने आतापर्यंत मला अनेकवेळा सेवा करण्याची संधी दिली आहे. त्यांच्यामुळेच माझ्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. या काळात मी अनेक पदे मंत्रीपदी भूषवत कराडकरांची सेवा केली. परंतु, मतदार माझ्यावर का नाराज झाले? मी कुठे कमी पडलो? याचे विश्लेषण करावे लागेल, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

माध्यमांशी संवाद : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा धक्कादायक रित्या पराभव झाला. तसेच राज्यात महाविकास आघाडीलाही मोठे अपयश आले. या सर्व परिस्थितीवर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

जनतेची सेवा करतच राहणार : मी कोणत्याही पदावर नसलो; तरी कराड दक्षिणमधील जनतेची सेवा करतच राहणार असल्याचे सांगत श्री. चव्हाण म्हणाले, मी कोणत्याही पदासाठी कधी काम करत नाही. आतापर्यंत मला अनेक पदे मिळाली. परंतु, यापुढेही आपण राजकारण, समाजकारणात सक्रिय राहून जनतेची सेवा करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मतपेटीत आधीच मते टाकून मतमोजणी : धक्कादायक निकालावर मत व्यक्त करताना श्री. चव्हाण म्हणाले, कराड दक्षिणसह राज्यभरात लागलेला निकाल निश्चितच धक्कादायक आहे. अशा निकालाची कोणालाही अपेक्षा नव्हती. शेवटी राज्यभरातील जनतेने घेतलेला निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल. लाट होती का काय, माहित नाही. परंतु, यात काहीतरी भानगड असल्याचे अनेक सहकाऱ्यांचे म्हणणे आहे. 30 – 40 हजार मते आधीच मतपेटीत टाकून नंतर मतमोजणी चालू केली, असे वाटण्यासारखा हा निकाल आहे. मात्र, नक्कीच हा मोठा सेटबॅक असून महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना एकत्र बसून यावर विश्लेषण करावे लागेल, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

लोकांना गृहीत धरले नाही : राज्यात लोकसभेचे यशानंतर विधानसभेला पीछेहाट का झाली? या प्रश्नावर ते म्हणाले, लोकसभेच्या यशानंतर आम्ही लोकांना मुळीच गृहीत धरले नाही. कोणताही राजकीय कार्यकर्ता जनतेला गृहीत धरत नाही. त्यामध्ये रणनीतीचा फरक असू शकतो. परंतु, राज्यात लागलेल्या निकाल नक्कीच धक्कादायक आहे. यावर सर्व सहकाऱ्यांशी बोलून अनेक तर्क वितरकांवर चर्चा करावी लागेल. आताच त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही.

‘लाडकी बहीण’ इफेक्ट : एका प्रश्नावर बोलताना श्री. चव्हाण म्हणाले, ते म्हणाले, हरियाणाचा निकाल निगेटिव्ह गेला, ही खरी गोष्ट आहे. महायुती पूर्णपणे इक्वलाइज झाली होती. त्यांच्यासाठी एक आशेचा किरण निर्माण झाला. हरियाणातील निकालावर त्यांनी मिमांसा केली. परंतु, काही दिवसानंतर हरियाणा इफेक्ट संपून सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या इफेक्टचे विश्लेषण करावे लागेल.

जातीपातीचे राजकारण… कधीच नाही : मविआच्या जातीपातीचे राजकारण, जरांगे फॅक्टर आणि लाडकी बहीण योजनेचा महायुतील फायदा मिळाला? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडीने कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. उमेदवार निवडताना या गोष्टीचा प्रत्येक पक्ष विचार करतो. परंतु, महाविकास आघाडीने जातीपातीचे राजकारण केले, यात तथ्य नाही. उलट भाजपने मराठा – ओबीसी, आदिवासी – धनगर, हिंदू  दलित – बुद्धिस्ट दलित असे विभाजन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे राज्याच्या भविष्यासाठी चांगले नसून राज्यात असलेले सौदार्याचे वातावरण बिघडले आहे. 

मताधिक्यांचा फरक सारखाच? 

सातारा जिल्ह्यात महायुतीच्या सर्व जागा निवडून आल्या असून महाविकास आघाडीला अपयश आले आहे. तसेच विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांच्यामध्ये तब्बल 30 ते 40 हजारांचा फरक आहे. हा फरक जवळपास सर्वत्र सारखाच कसा काय? असा प्रश्न उपस्थित करून महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करायला कमी पडलो का? यावरही आम्ही सर्वांनी विचार करायला हवा, असे त्यांनी सांगितले. 

धरसोड वृत्तीमुळे प्रभाव निष्फळ 

मराठा आंदोलन आणि महाविकास आघाडीचा थेट काहीही संबंध नव्हता. मराठा आंदोलकांनी काही भूमिका घेतल्या. नंतर त्यातून माघार घेतली. त्यांच्या धरसोड वृत्तीमुळे त्याचा फारसा प्रभाव पडला नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!