काँग्रेसच्या रक्तात इंग्रजांचा डीएनए 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

योगी आदित्यनाथ यांचा घणाघात; मसुरला मनोज घोरपडे यांच्या प्रचाराची विराट सांगता सभा  

कराड/प्रतिनिधी : –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार राज्य समाज जोडण्याचे काम सुरू आहे. परंतु, देशात ज्याप्रमाणे इंग्रजांनी लोकांवर अन्याय, अत्याचार केले. ‘फोडा आणि राज्य करा’ अशी रणनीती अवलंबली. त्याचप्रमाणे काँग्रेस व महाअनाडी तोडण्याचे काम करते आहे. ज्या काँग्रेसने देशासह हिंदू समाज, जात-पात, क्षेत्र, भाषेच्या नावावर फूट पाडण्याचे काम केले, त्या काँग्रेसचा डीएनए इंग्रजांचाच झालाय, असा घणाघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला.

मसूरला विराट सांगता सभा : मसूर (ता. कराड) येथे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीतर्फे भाजपचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार मनोजदादा घोरपडे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, किसन मोर्चाचे अध्यक्ष रामकृष्ण वेताळ, निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मसूर : उपस्थित जनसमुदायास विजयाचे खून दर्शवत अभिवादन करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उमेदवार मनोज घोरपडे व मान्यवर.

संपूर्ण देशात एकजूट करा : आपल्यात फूट पडली त्यावेळी राम मंदिर, काशी विश्वनाथ, मथुरा येथे आपल्याला अपमान सोसावा लागल्याचे सांगत योगी आदित्यनाथ म्हणाले, महाराष्ट्रात स्फूर्तीस्थान असलेल्या शिवरायांच्या गड-किल्ल्यांवर अतिक्रमणे होत आहेत. गणपती, रामनवमी सारख्या मिरवणुकांवर दगडफेक होते. ‘हम बटे थे तो कटे थे’. त्यामुळे ‘हम एक है तो सेफ है’, हे ओळखून संपूर्ण देशाला एकजूट करण्याचे काम आपल्याला करायचे आहे. तसेच मोदींच्या नेतृत्वाखाली नवीन भारत निर्माण करायचे आहे. ‘सबका साथ सबका विकास’ यानुसार सर्व योजनांचा लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला जाणार आहे. 

काँग्रेसचा मनसुबा यशस्वी होऊ देऊ नका : मोदींनी काश्मीरमध्ये 370 कलम पूर्णपणे संपवले आतंकवाद नियंत्रणात आणला. परंतु, काँग्रेसचा जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा 370 कलम आणण्याचा मनसुबा यशस्वी होऊ देऊ नका. देशात आतंकवाद, नक्षलवाद वाढवणाऱ्या भ्रष्टाचारी काँग्रेस सरकारला पुन्हा स्थान देऊ नका, असे आवाहन करत योगी आदित्यनाथ म्हणाले, मोदींनी 4 कोटी लोकांना घरे दिली, 10 कोटी शौचालय उभारली, 10 कोटी घरात उज्वला गॅस योजना पोहोचवली, 12 कोटी लोकांना किसान सन्मान योजनेचा लाभ दिला, 50 कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 5 लाखांपर्यंत मोफत उपचार दिले. आता 70 वर्षांवरील प्रत्येकाला मोफत उपचार देणार असल्याचे मोदींनी जाहीर केले असून 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिले जात आहे. तसेच महामार्ग, रेल्वे,  विमानसेवा, हर घर जल, मेडिकल कॉलेज शिक्षण व्यवस्था आदींच्या माध्यमातून विकास होत आहे.

काँग्रेसच्या अजेंड्यावर हे मुद्दे कधी नव्हते : राम मंदिर उभे राहिला 500 वर्षे जावे लागले. काँग्रेसला राम मंदिर करता आले असते. परंतु, त्यांच्या अजेंड्यावर राम मंदिरासह मुलींची सुरक्षा, महिलांचा सन्मान, युवकांसाठी रोजगार, शेतकरी सन्मान हे मुद्देही कधी नव्हते. त्यामुळे देशात सुरक्षा, समृद्धी आणि सुशासन घडवण्यासाठी महायुती सरकारला साथ देणे गरजेचे असून मोदींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

मसूर : उपस्थित जनसमुदायास विजय मताधिक्य देण्याचे आवाहन करताना उमेदवार मनोज घोरपडे.

निवडणूक जनतेनेच हातात घेतली : कराड उत्तरची निवडणूक ही जनतेनेच हातात घेतली घेतल्याचे सांगत मनोज घोरपडे म्हणाले, विरोधकांच्या नेत्यांनी मतदारसंघातील अवस्था पाहता तुतारीला वेळ देऊन उपयोग नसल्याचे जाणून सभेला दांडी मारली. यावरून उत्तरेतील निकाल स्पष्ट होतो. पाच वेळा लोकांनी संधी देऊनही विद्यमान आमदार अजूनही विकास करायच्या बातम्या मारत आहेत. तीन वेळा सरपंच राहिलेल्या पेरे – पाटलांना लोकांनी घरी पाठवले. तर उत्तरेतील लोकप्रतिनिधींचे काय केले पाहिजे, हे जनतेने ठरवावे. बिनकामाचे आमदार म्हणून ते महाराष्ट्रभरात परिचित आहेत. त्यामुळे आपण संधी दिल्यावर येत्या पाच वर्षांत मागील 25 वर्षांचा विकासकामांचा बॅकलॉग भरून काढत अधिकचा विकास करण्यावर भर देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

औद्योगिक मागास मतदारसंघाचा विकास करणार : 25 वर्षांपासून रखडलेल्या हणबरवाडी – धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा भाजपच्या माध्यमातून पूर्ण केला असून निवडून आल्यावर सहा महिन्यांच्या आत दुसरा टप्पा पूर्ण होऊन शिवारात पाणी खळाळेल, असे सांगत मनोज घोरपडे म्हणाले, तसेच मतदारसंघातील तारळीचे 50 मीटरचे हेड वाढवून 100 मीटर करून घेण्याचा शब्द मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतला आहे. उरमोडी, काशीळ, गणेशवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लावणार असून औद्योगिक मागास असलेल्या मतदारसंघात विकास करून युवकांच्या हाताला काम देणार आहे. मीही शेतकऱ्याचा मुलगा असून मला आपली सेवा करण्याची संधी देवून विद्यमान आमदारांना पश्चिम महाराष्ट्रात पहिल्या नंबरने पाडण्याची व्यवस्था करा, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले.

उत्तरेतील जनतेला अयोध्येचे निमंत्रण 

योगी आदित्यनाथ यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि उमेदवार मनोज घोरपडे यांना विजयाचा गुलाल घेऊन उत्तरेतील जनतेला अयोध्या दर्शन घडवण्यासाठी रेल्वेने घेऊन या. बाकी सर्व व्यवस्था मी करतो. तसेच प्रयाग्रज येथे होणाऱ्या महाकुंभ मेळ्याचेही निमंत्रणही त्यांनी यावेळी सर्वांना दिली. 

विरोधकांचा खेळ बंद होईल 

विद्यमान आमदारांच्या ‘मला यावेळी फुलटॉस आलाय, या विधानाचा समाचार घेताना मनोज घोरपडे म्हणाले, या फुलटॉसने विद्यमान आमदारांची बॅट आणि दांड्या दोन्ही गुल होऊन त्यांचा खेळ बंद होईल, अशीही टीका त्यांनी केली. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!