खा. सचिन पायलट; पृथ्वीराजबाबांच्या प्रचारार्थ विराट सांगता सभा
कराड/प्रतिनिधी : –
भाजप, महायुती सरकारमध्ये सुरू असलेल्या पदाच्या लढाईवरून विकास काय होणार, हे तुमच्या लक्षात येईल. पृथ्वीराजबाबांना तुम्ही आजपर्यंत अनेकदा निवडून दिले. त्यांच्यासारखा सभ्य व अंगावर कोणताही डाग नसणारा हा नेता लाभला हे कराडकरांचे भाग्य आहे. बाबांनी मान, सन्मान आणि पदे मिळवली. त्यातून तुमची मान कोणासमोर झुकू दिली नाही. असा स्वाभिमानी नेता जपा. जातीवादी नेत्यांना कडवे उत्तर देत बाबांना पुन्हा राज्याचे नेतृत्व करण्याची संधी द्या, असे आवाहन खा. सचिन पायलट यांनी केले.
विराट सांगता सभा : कराड येथील शिवतीर्थ दत्त चौकात झालेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट सांगता सभेत ते बोलत होते.
मान्यवरांनी उपस्थिती : यावेळी विचारमंचावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, कर्नाटकचे माजी मंत्री विनयकुमार सोरके, काँग्रेसचे निरीक्षक प्रकाश नहाटा, कराड उत्तरचे आ. बाळासाहेब पाटील, अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पोपटराव साळुंखे, माजी नगरसेवक अरुण जाधव, माजी नगराध्यक्ष अशोकराव भोसले, अल्ताफ शिकलगार, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, फारूक पटवेकर, अर्चना पाटील, कराड तालुका शिवसेना प्रमुख नितीन काशीद, फारूक पटवेकर, यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
दक्षिणची काँग्रेसला साथ : स्वातंत्र्यापासून आजतागायत कराड दक्षिणच्या जनतेने काँग्रेसला साथ दिल्याचे सांगत खा. पायलट म्हणाले, आ. पृथ्वीराज चव्हाण व त्यांच्या आई, वडिलांनी येथील जनतेची सेवा केली. परंतु, या निवडणुकीत विरोधक मतदारांना अमिष दाखवतील, त्याला भुलू नका. जनतेने भाजपचा लोकसभेत चारशे पारच्या घोषणेला धडा शिकवला. ईडी, सीबीआयचा वापर करून राज्यातील अनेक नेत्यांना आपल्या बाजूला घेतले. केंद्रातील डबल इंजिन सरकार दुसऱ्यांच्या कुबड्या घेवून उभे राहिले. तर महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन सरकार फक्त धूर सोडत आहे. आम्हाला काम करणारे सरकार हवे आहे.
फडणवीस यांना विसर : मी मुख्यमंत्री असताना नागपूरला आणलेले दोन मोठे उद्योग देवेंद्र फडणवीस विसरताहेत, असे सांगत आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराडला जगातील दुसरे भूकंप संशोधन केंद्र असून अशी अनेक विकासकामे करून कराड हे जिल्हा पातळीवरचे गाव केले आहे, हा विकास न दिसणाऱ्या मंडळींना विकासाची व्याख्या समजलेली दिसत नाही.
आंतरराष्ट्रीय नेत्याच्या पदवीचे स्वागत : कराड शहर हे माझे घर आणि मतदारसंघ हे माझे कुटुंब आहे. तुमच्या आशीर्वादामुळे मला राजकीय उंची गाठता आल्याचे मी विसरू शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मला दिलेल्या आंतरराष्ट्रीय नेत्याच्या पदवीचे मी स्वागत केले. मी काय सडक छाप राजकारणी नाही. असे मिश्किलपणे सांगत यशवंतराव चव्हाण यांची शिकवण आम्ही कायम जपली. पी. डी. पाटील यांनी कराडची जडणघडण केली. विलासकाकांनीही या मतदारसंघाची उंची वाढवली. याची जाणीव राखून मतदारसंघातील जनतेने कधीही जातीयवादी लोकांना थारा दिला नाही, देवू नये.
विरोधकांकडे राजकीय वजन नाही : विकासकामे व प्रकल्प लाईट वेट नेते आणू शकत नाहीत. त्यासाठी राजकीय वजन लागते. ते विरोधी उमेदवाराकडे नसल्याचे सांगत आ. चव्हाण म्हणाले, राज्याच्या हिताचे निर्णय मी पुन्हा घेईन. राज्य शिखर बँकेला वाचविण्याचा माझा हेतू स्वच्छ होता, त्याचा फायदाच झाला. सद्या कराड दक्षिणमध्ये वेगळी संस्कृती रुजवली जात आहे. कराडचे राजकारण बिघडू द्यायचे नाही. तुमच्या आशीर्वादातून मी उतराई न होण्याइतके ऋण माझ्यावर हे मी विसरू शकत. असे सांगताना कराड दक्षिणमध्ये पुन्हा इतिहास घडवूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तुमचा सन्मान वाढवा :महायुतीचे सरकार सत्तेवर आले. त्यावेळेस अडीच लाख कोटी कर्ज होते. आता राज्यावर साडेनऊ लाख कोटी रुपये कर्ज आहे. हे सर्व कर्ज तुमच्या सर्वांच्या डोक्यावर आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना निवडून देवून तुमचा सन्मान वाढवा, असे आवाहन माजी आ. रामहरी रुपनवर यांनी केले.
पृथ्वीराजबाबांना साथ द्या :आ. पृथ्वीराज चव्हाण हे सर्वांना बरोबर घेवून जाणारे नेते असल्याचे सांगत आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, बाबांनी आयुष्यभर काँग्रेसची विचारधारा घेवून मार्गक्रमण केले. राज्यात सत्ता परिवर्तन घडेल, हे नक्की. त्यासाठी पृथ्वीराजबाबांना, त्यांच्या विचारांना तुम्ही साथ द्यावी.
काका – बाबांनी विचारधारा पुढे नेऊया : या निवडणुकीत विविध लोकांकडून बुद्धिभेद करण्याचा, फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. नुकतेच पैसे वाटण्याचा प्रकारही समोर आला आहे. अशा आमिषांना बळी पडू नका. काका – बाबांनी काँग्रेसचा विचार जपला. आपल्यालाही त्यांचे विचारधारा पुढे न्यायची आहे, असे आवाहन अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर यांनी केले.
भाषणे : शिवराज मोरे, शारदाताई जाधव यांची भाषणे झाली. प्रा. दिपक तडाखे व राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगराध्यक्ष अशोकराव भोसले यांनी आभार मानले.
उड्डाणपुलासाठी 540 कोटी निधी
मी केंद्रात मंत्री असताना राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी संजय मिश्रा माझ्याबरोबर काम केलेय. त्यांच्याकडून मी कराडचा उड्डाणपूल करण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगत आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पैसै सरकारचे असले तरी माझ्या प्रयत्नांतून मिळालेल्या 540 कोटी रुपयांचा पुल उभारला जात आहे. सिंगल पिलरची कल्पना मांडल्यामुळेच भविष्यात कराड उड्डाणपुलाची वाहतूक कमी होईल. राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक सुरळीत होणार आहे. त्यावेळेस चौदापदरी मार्ग करण्यासाठी प्रयत्न झाले नसते, तर हे काम झालेच नसते. यामुळे पुढील तीस वर्षांतील कराड आणि मलकापूर भागातील रहदारीचा प्रश्न सुटला असल्याचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
आ. बाळासाहेब पाटील व आ. पृथ्वीराज चव्हाण एकत्र
या सभेत आ. बाळासाहेब पाटील यांचे विचारमंचावर आगमन होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ते भाषणाला उभे राहिल्यानंतर त्यांच्या समवेत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केले. दोन्ही नेत्यांच्या एकत्रित अभिवादनामुळे कराड शहरात सकारात्मक मेसेज केल्याची चर्चा सुरु आहे.
‘पढोगे तो बढोगे’ चा नारा हवा
देशात कोणीही महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचारावर न यावर बोलता जातीयवादी ‘बटेंगे – कटेंगे’ म्हणणाऱ्यांना आपण ‘पढोगे तो बढोगे’ चा नारा दिला पाहिजे. काँग्रेसच्या नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी आहुती दिली. पण ज्यांना काहीच खरचटलेले नाही, ते सतत जातीभेद करताहेत. त्यांच्याकडे दाखवायला विकासाचे रिपोर्ट कार्डच नसल्याने ते आपल्या सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी असले उद्योग करत असल्याची टीकाही खा. पायलट यांनी विरोधकांवर केली.