कराड/प्रतिनिधी : –
एका बाजूला लाडकी बहीण योजना आणायची. दुसऱ्या बाजूला महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत, युवकांच्या हाताला काम नाही, त्यांच्या हाती पुन्हा राज्याची सत्ता द्यायची का, असा सवाल ऑनलाइन भाषणात करत राज्य चालविण्यास पूर्ण अपयशी ठरलेल्या महायुती सरकारला हद्दपार करा, असे आवाहन ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांनी केला.
रहिमतपुरला विराट सांगता सभा : महाविकास आघाडीतर्फे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आ. बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ रहिमतपूर येथे शुक्रवारी विराट सांगता सभा झाली. यावेळी खा. शरद पवार यांनी मोबाईलवरून मतदारांशी संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, डॉ. भारत पाटणकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, मानसिंगराव जगदाळे, काँग्रेसचे अजितराव पाटील चिखलीकर, तालुकाध्यक्ष निवास थोरात, जितेंद्र पवार, देवराज पाटील , चंद्रकांत जाधव, संगीता साळुंखे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
आ. बाळासाहेब पाटील यांच्याकडे महत्वाची जबाबदारी देणार : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची परंपरा आहे. तर स्वर्गीय पी. डी. पाटील साहेब यांनीही या मतदारसंघाचे नेतृत्व केले केल्याच्या सांगत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीत उत्तरच्या जनतेने या मतदारसंघाची परंपरा जपण्याचे आवाहन केले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असून त्यात आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे शरद पवार साहेब महत्वाची जबाबदारी देणार आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी बोलताना केले.
महिलांना मोफत एसटी प्रवास : गत विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. करोना काळामध्ये या सरकारने प्रभावी कामगिरी केल्याची सांगत आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मात्र, करोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी प्राधान्य दिल्याने विकासकामांवर काही प्रमाणात मर्यादा आल्या होत्या. मात्र, नंतरच्या काळात मोदी, शहांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात आले. महायुती सत्तेवर आली. मात्र, राज्यातील जनतेने भाजप महायुतीच्या उमेदवारांचा पराभव केला. लोकसभेतील दारुण पराभवानंतर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली. मात्र, महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर आम्ही महिलांना प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये देणार असून एसटी प्रवास महिलांना मोफत करणार आहोत. यावेळची निवडणूक राज्यात कोणत्या विचाराचे सरकार येणार, हे निश्चित करणारी आहे. त्यामुळे विचारपूर्वक मतदान करावे.
शेवटपर्यंत शरद पवारांची साथ देणार : महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर माझ्यावर सहकार मंत्री पदाची जबाबदारी पवारांनी सोपवली होती, असे सांगत आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, अडीच वर्षांत सत्तांतर झाल्यावर राष्ट्रवादीचे सहकारी पवार साहेबांना सोडून गेले. त्या काळातही पवार साहेब स्थितप्रज्ञ राहिले. दुसऱ्या दिवशी कराडला आले. त्यावेळी त्यांचे जनतेने विशेषत: जल्लोषात स्वागत केले. त्यावेळी मलाही फोन येत होते. परंतु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना स्वर्गीय पी. डी पाटील यांनी साथ केली. त्याप्रमाणे मी ही शरद पवार यांना शेवटपर्यंत साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्थित्यंतरात उत्तरचा एकही माणूस आम्हाला , पक्षाला सोडून गेला नाही. मंत्री पद असतानाही उत्तरसह जिल्ह्याचे व राज्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.
भाषणे : यावेळी सुनील माने, डॉ. भारत पाटणकर, देवराज पाटील, संगीता साळुंखे यांची भाषणे झाली. रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष अविनाश माने यांनी आभार मानले.
शरद पवार यांच्या अनुपस्थितीची खंत
रहिमतपूरमध्ये शरद पवार यांची सातारा जिल्ह्यातील पहिली सभा होणार असल्याने कराड उत्तरच्या हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या सभेपूर्वी पवारांच्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी सभा होत्या. पाऊस पडल्याने शरद पवारांच्या हेलिकॉप्टर प्रवासावर मर्यादा आल्या. चंदगडची सभा संपवून पवार यांनी कारने कराडच्या दिशेने प्रवास सुरू केला. मात्र ते रात्री दहापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे पवार यांनी फोनवरून कार्यकर्त्यांना संबोधित केले.