विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कराड शेती उत्पन्न बाजार समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
कराड/प्रतिनिधी : –
कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेले 19 वे स्व. यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशु-पक्षी प्रदर्शन, कृषी महोत्सव यावर्षी तांत्रिक अडचणीमुळे लांबणीवर गेले आहे. राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर ऐवजी डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार असल्याची माहिती कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील यांनी दिली.
पत्रकार परिषद : कृषी प्रदर्शनाच्या बदललेल्या तारखांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपसभापती संभाजी काकडे, संचालक विजयकुमार कदम, संभाजी चव्हाण, नितीन ढापरे, श्री. शंकरराव इंगवले, जयंतीलाल पटेल, जे. बी. लावंड, सर्जेराव गुरव, प्रभारी सचिव ए. आर. पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रतिवर्षी लाखो शेतकऱ्यांची प्रदर्शनाला भेट : प्रतिवर्षी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथे शेती उत्पन्न बाजार समितीचे वतीने दि. 24 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत स्व. यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशु-पक्षी प्रदर्शन, कृषी महोत्सव राज्यस्तरीय प्रदर्शन आयोजित करण्यात येत असते. हे प्रदर्शन राज्यभरातील शेतकऱ्यांच्या भरघोस प्रतिसादामुळे अविरत सुरू आहे. प्रतिवर्षी लाखो शेतकरी या प्रदर्शनाला भेट देऊन आधुनिक शेती, तंत्रज्ञानाची माहिती घेत असतात. या प्रदर्शनात महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग, महसूल व सहकार विभाग, तसेच इतर विविध विभाग सहभागी होऊन शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतात.
विधानसभा निवडणुकीमुळे कालावधीत बदल : यावर्षी प्रथमच प्रदर्शन कालावधीमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू असून ही सर्व शासकीय यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त आहे. तसेच ज्या मैदानात प्रदर्शन भरवण्यात येते, ते मैदान देखील निवडणूक कामासाठी दि. 19 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत आयोगाकडे वर्ग करण्यात आल्याने यावर्षीचे प्रदर्शन 24 ते 28 नोव्हेंबर ऐवजी दि. 6 ते 10 डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. तरी प्रदर्शनाच्या तारखेत झालेल्या बदलाची सर्व शेतकरी बांधव, नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.