सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आला नवा वाघोबा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

100 किलोमीटरचे अंतर कापून नव्या वाघाचे आगमन 

कराड/प्रतिनिधी : – 

गतवर्षी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल झालेला वाघ वर्षभरानंतरही व्याघ्र प्रकल्पात नांदत असताना, आता प्रकल्पामध्ये नवा वाघोबा आला आहे. याबाबतची माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी दिली.

वाघोबाचे राधानगरीतून चांदोलीत आगमन : राष्ट्रीय उद्यानामधून नर वाघाचे छायाचित्र टिपण्यात व्याघ्र प्रकल्पातील कर्मचार्यांना यश मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे या वाघाची ओळख पटली असून कोल्हापूरमधील राधानगरी वन्यजीव अभयारण्यामधून हा वाघ चांदोलीत आला आहे.

प्रथमच झाली होती वाघाची नोंद : 2018 सालानंतर गेल्यावर्षी 17 डिसेंबर रोजी प्रथमच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघाची नोंद झाली होती. या वाघाची ओळख न पटल्याने त्याचे नामकरण ‘एसटीआर-1’ असे करण्यात आले. गेल्या वर्षभरात अगदी मुसळधार पावसातही व्याघ्र प्रकल्पातील कर्मचार्यांनी या वाघाच्या हालचालींवर देखरेख ठेवली. आता वर्षभरानंतरही हा वाघ व्याघ्र प्रकल्पामध्येच अस्तित्वात असल्याचे लक्षात आले आहे.

‘टायगर सेल’ संशोधन विभागाची तपासणी : 24 ऑक्टोबर 2024 रोजी चांदोली राष्ट्रीय उद्यानात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपने राती 11 वाजून 46 मिनिटांनी एका नर वाघाचे छायाचित्र टिपले. हे छायाचित्र व्याघ्र प्रकल्पाच्या ‘टायगर सेल’ या संशोधन विभागाने तपासले. तपासणीअंती हे छायाचित्र ‘एसटीआर-1’ या वाघाचे नसून दुसऱ्या वाघाचे असल्याचे निदर्शनास आले.

सह्याद्री : ‘एसटीआर-2’, असे करण्यात आलेला नवा वाघोबा.

संशोधक गिरीश पंजाबी यांच्याकडून दुजोरा : सह्याद्री व्याघ्र भ्रमणमार्गातीला वाघांवर अभ्यास करणारे संशोधक गिरीश पंजाबी यांच्याकडे या वाघाचे छायाचित्र तपासण्यासाठी पाठविण्यात आले. त्यांनी हे छायाचित्र राधानगरीमध्ये 2022 साली छायाचित्रित झालेल्या नर वाघाचे असल्याचे सांगितले. त्यामुळे आता या नव्या वाघाचे नामकरण ‘एसटीआर-2’, असे करण्यात आले आहे.

सह्याद्री : व्याघ्र प्रकल्पात आलेला नवीन वाघ.

राधानगरीत एसटीआर-2’ वाघाचा वावर : कोल्हापूरच्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यामध्ये 23 एप्रिल 2022 रोजी ‘एसटीआर-2’ या वाघाचा वावर निदर्शनास आला होता. गेल्या दोन वर्षांपासून हा वाघ राधानगरीमध्येच वास्तव्यास होता. राधानगरीत या वाघाचे शेवटचे छायाचित्र यंदाच्या उन्हाळ्यात 13 एप्रिल 2024 रोजी टिपण्यात आले होते. त्यानंतर पावसाळयात साधारण 100 किलोमीटरचे अंतर कापून हा वाघ चांदोली राष्ट्रीय उद्यानात दाखल झाला आहे.

ताडोबातून सह्याद्रीत होणार मादी वाघाचे स्थानांतरण : हा नर वाघ अंदाजे सहा ते सात वर्षांच्या असून मादीच्या शोधात तो चांदोलीत आल्याची शक्यता आहे. परंतु, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सध्या मादी वाघाचे अस्तित्व नाही. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात मादी वाघाचे स्थानांतरण करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. गेल्या काही वर्षात सह्याद्रीच्या दक्षिणेस असलेल्या तिलारी ते राधानगरी भ्रमणमार्गामध्ये वाघांची संख्या वाढली आहे.

भ्रमणमार्ग वाघांच्या संचारासाठी अनुकूल : तिलारी ते सह्याद्री या व्याघ्र भ्रमणमार्गामधून ‘एसटीआर-1’ आणि ‘एसटीआर-2’ हे दोन्ही नर वाघ नैसर्गिकरित्याच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे हा भ्रमणमार्ग वाघांच्या संचारासाठी अनुकूल असल्याचे अधोरेखित झाले आहे. व्याघ्र प्रकल्पामध्ये सुरु असलेल्या उत्कृष्ट देखरेख व संरक्षण कामासाठी व ‘STR-T1’ व ‘STR-T2’ या दोन्ही वाघांच्या झालेल्या नोंदीबद्दल क्षेत्रसंचालक श्री. रामानुजम यांनी सर्व क्षेत्रीय कर्मचारी व वन अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!