आ. पृथ्वीराज चव्हाण; कराड शहर व परिसरात वाढता पाठिंबा
कराड/प्रतिनिधी : –
राज्यात जातीयवादी भाजपला लोकसभेत जनतेने धडा शिकवला. याच जातीयवादी मंडळींना कराडकरांनी दोनदा हद्दपार केले असून त्यांना तिसऱ्यांदा पराभूत करून कराड दक्षिणेचा काँग्रेसचा गड शाबूत ठेवा, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
मंगळवार व बुधवार पेठेत पदयात्रा : शहरातील मंगळवार व बुधवार पेठेत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पदयात्रा काढली. त्यानंतर महात्मा फुलेनगर येथे झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र शेलार, माजी नगरसेवक फारुख पटवेकर, प्रदीप जाधव, सिद्धार्थ थोरवडे, शितल वायदंडे, ज्ञानदेव राजापुरे, राहुल चव्हाण, शिवराज मोरे, झाकीर पठाण, जुबेर मोकाशी, ऋतुराज मोरे, शिवसेनेचे शहर प्रमुख शशिराज करपे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नोकऱ्यांच्या खोट्या आश्वासनांना भुलू नका : या निवडणुकीत विरोधकांकडून नोकऱ्या देण्याची आश्वासने दिली जातील, त्याला भुलू नका. कराडची जनता कधीही आपला स्वाभिमान विकणार नाहीत. विरोधक वाममार्गाने मिळवलेल्या पैशातून मते विकत घेण्याचा प्रयत्न करतील. मात्र, कराडची जनता त्यांच्या पैशाची दहशत मोडून काढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कराडचा नावलौकिक टिकवा : पृथ्वीराज चव्हाण यांनी सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी जीवन वेचले आहे. अशा व्यक्तिमत्वाला निवडून देवून कराडचा नावलौकिक टिकवा, असे आवाहन राजेंद्र शेलार यांनी केले.
पृथ्वीराजबाबांना साथ द्या : जातीयवादी लोकं खोटा प्रचार करत आहेत. परंतु, काँग्रेसने वंचितांचे हक्क टिकवून ठेवलेत. राज्यातच नव्हे, तर देशात ओळख असलेल्या पृथ्वीराज बाबांना साथ द्या, असे आवाहन डॉ. मधुकर माने यांनी केले.
मान्यवरांची भाषणे : शिवाजीराव सन्मुख, बबनराव जाधव, शिवराज मोरे, अक्षय सुर्वे, प्रा. अमित माने, फारुख पटवेकर यांची भाषणे झाली. यावेळी अक्षय सुर्वे व रियाज नदाफ यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांना आपला पाठिंबा जाहीर केला. स्वागत ओंकार माने, सूत्रसंचालन युवराज भोसले, रमेश वायदंडे यांनी आभार मानले.
152 झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन
डॉ. अतुल भोसलेंनी पृथ्वीराजबाबांच्या घराशेजारील झोपडपट्टीचा मुद्दा उपस्थित केल्याचे सांगत संतोष थोरवडे म्हणाले, 2017 मध्येच 152 झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन झाल्याचे त्यांना माहित नाही. उर्वरित लोकांची सदनिका ताब्यात घेण्यासाठी लागणारा स्वनिधी भरण्याची परिस्थिती नसल्याने संबंधित लोकं नवीन घरात गेलेले नाहीत. परंतु, याचा बाव करून ते रेटून खोटे सांगत आहेत.