अविनाशदादांची ताकद पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

रेठरे बुद्रुक येथील संस्थापक पॅनलच्या कार्यकर्त्यांचा बैठकीत निर्धार

कराड/प्रतिनिधी : – 

रेठरे बुद्रुक, ता. कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलने आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी ताकद उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अविनाश मोहिते यांच्या कराड दक्षिणमधील मोठ्या गटाने पाठिंबा दिल्यामुळे आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा विजय सुकर झाला आहे.

संस्थापक पॅनेलचे दक्षिणमधील कार्यकर्ते चार्ज : महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काम करत आहे. अविनाश मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते खा. शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. या पक्षात अविनाशदादांकडे प्रदेश स्तरावरील जबाबदारी आहे. गेल्या महिन्यात खा. शरद पवार यांनी अविनाश मोहिते यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीमध्ये श्री. मोहिते यांनी कृष्णा कारखान्याचे संस्थापक आबासाहेब मोहिते आणि शरद पवार यांचे ऋणानुबंध असणारे जुने छायाचित्र खा. पवार यांना भेट दिले. या भेटीमुळे अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलचे कराड दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्ते चार्ज झाले आहेत.

बैठकीस पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती : सध्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अविनाश मोहिते यांनी रेठरे बुद्रुक येथे आपल्या निवडक कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीस आ. पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. यावेळी अॅ ड.  उदयसिंह पाटील – उंडाळकर, जगन्नाथ मोहिते, मदनराव मोहिते, अमरसिंह मोहिते, जयेश मोहिते, शिवराज मोहिते, अजितराव पाटील – चिखलीकर, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, शिवाजीराव मोहिते, अॅ ड. नरेंद्र नांगरे – पाटील, डॉ. अजित देसाई, राष्ट्रवादी काँगेसचे तालुकाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष पाटील, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सर्व माजी संचालक, तसेच संस्थापक पॅनेलचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

कराड दक्षिणमध्ये विचारांची लढाई : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्याची चिन्हे असून विदर्भ व मराठवाड्यातही महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार असल्याचे सांगत आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराड दक्षिणमध्ये खऱ्या अर्थाने विचारांची लढाई आहे. यशवंतराव मोहिते, आनंदराव चव्हाण व आबासाहेब मोहिते हे विशिष्ट विचाराने लढले. त्यांनी बहुजन समाजाच्या विकासाचा मूलभूत विचार कधी सोडला नाही. त्यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षामुळे या विभागात सहकार चळवळ उभी राहिली. परंतु, काही लोकांनी विभागातील सहकारी संस्थांचे जाळे राजकीय सत्तेसाठी आर्थिक केंद्रे बनविण्याचे समीकरण महत्वाचे मानली असून ही प्रवृत्ती आपल्याला इथेच थांबवली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना झुकते माप : 

गेली दहा वर्षे राज्यात भाजपची सत्ता असून या काळात सर्वांना खूप त्रास झाला. विकासकामे करण्यातही त्यांनी अडवणूक केलेच सांगत आ. चव्हाण म्हणाले, राज्यात आता काँग्रेसची सत्ता येणार असून कराड दक्षिणमधील महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना झुकते माप दिले जाणार आहे.

विधानसभा निवडणूक विरोधकांचा तीस दिवसांचा खेळ : रेठऱ्याच्या कृष्णा नदीवरील जुना पुल कृष्णा कारखान्याची सत्ता असूनही त्यांना दुरुस्त करता आला नाही. पृथ्वीराजबाबांनी गटतट न बघता जुना पुल दुरुस्त करत नवीन पुलासाठी निधी आणल्याचे सांगत बंडानाना जगताप म्हणाले, विधानसभेची निवडणूक हा विरोधकांचा तीस दिवसांचा खेळ आहे. पृथ्वीराजबाबांनी कोणाच्याही विरोधात कोणताही अपप्रचार केलेला नाही. त्यामुळे असे सुसंस्कृत नेतृत्व जपणे गरजेचे आहे.

भांडवलदार व हुकुमशाही घालवूया : भांडवलदार व हुकुमशाही आपण घालवूया. पृथ्वीराज चव्हाण हे नोकरी करून अमेरिकेत इंजिनिअर झाले. कृष्णाकाठच्या विरोधकांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सत्ता व पैसा मिळवला. हा इतिहास कोणीही पुसू शकत नाही, असे मत अजितराव पाटील – चिखलीकर यांनी व्यक्त केले. 

संतोष पाटील, डॉ. अजित देसाई यांचेही भाषण झाले. मदनराव मोहिते यांनी स्वागत केले. दिग्विजय उर्फ आबा सुर्यवंशी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. सनी मोहिते यांनी आभार मानले.

कृष्णाकाठच्या विरोधकांचा बिमोड केल्याशिवाय पर्याय नाही 

कृष्णाकाठच्या विरोधकांचा या निवडणुकीत बिमोड केल्याशिवाय पर्याय नाही. कृष्णा कारखान्याची सद्यस्थिती व कामगारांची अवस्था आपण सर्वजण डोळ्याने पाहतोय. कृष्णा कारखान्यात बिहारी कामगार आणले आणल्याने आपल्या कामगारांवर अन्याय सुरू आहे. कृष्णा आणि रयत कारखान्याच्या ऊस दरातील फरक लक्षात घ्या. रयत कृष्णापेक्षा ऊसदर देण्यात पुढे असल्याचे बंडानाना जगताप यांनी सांगितले. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!