बिरू कचरे यांचा टोला; कासारशिरंबेत आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा संवाद
कराड/प्रतिनिधी :
स्व. विलासरावकाका पाटील-उंडाळकर यांच्या रयत संघटनेचा निष्ठावंत कार्यकर्ता आजही उदयदादांच्या सोबतीने पृथ्वीराजबाबांना आमदार करणारच आहे. कराड दक्षिणेत काॅंग्रेसचा हात सक्षम आहे. त्यामुळे आपल्या भागात कमळाचा उपयोगच नाही. काँग्रेसच हातच कमळ विझवायचे काम करेल, असा विश्वास रयत संघटनेचे बिरू कचरे यांनी व्यक्त केला.
कासारशिरंबेत आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा संवाद : कासारशिरंबे (ता. कराड) येथील कार्यकर्त्यांशी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी संवाद साधला. यावेळी पांडुरंग बोद्रे, कराड तालुका काॅंग्रेस उपाध्यक्ष जयवंत पाटील, प्रा. धनाजी काटकर, अजित पाटील- चिखलीकर, रयत कारखान्याचे संचालक जयवंत बोंद्रे, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक शंकर यादव, धनाजी थोरात, देवदास माने यांच्यासह रयत संघटना, तसेच काॅंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनतेने संविधानच बदलण्याचा भाजपचा डाव हाणून पाडला : आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी प्राणाची आहुती दिल्याचे सांगत आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसच्या व्यासपीठावर सर्व नेते एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. आपल्या देशाला घटना आवश्यक होती. अशा परिस्थितीत काॅंग्रेसने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटना तयार करण्यासाठी विनंती केली. आज त्यांनी देशाला दिलेले संविधानच बदलण्याचा डाव भाजपने आखला असून देशातील जनेतेने तो डाव हाणून पाडला. लोकसभेत भाजपला एकहाती सत्ता पाहिजे होती, ती लोकांनी दिली नाही. आता महाराष्ट्रातही भाजपला सत्ता मिळणार नसून महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सत्तेत येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यशवंतराव भाऊंच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल : इथून पाणंद ते तिथपर्यंत पाणंद आणि तिथून पाणंद ते इंथपर्यंत पाणंद रस्ता करण्याचे अतुल भोसले यांचे बोर्ड लागले आहे. परंतु, या कामांची वर्कआॅर्डर आहे का? अस लोकांनी त्यांना विचारलं पाहिजे. विलासकाकांनी डोंगरी भागात पाणी आणलं. पृथ्वीराज बाबांसारखा आंतरराष्ट्रीय किर्तीचा माणूस तुमच्या पुढे उभा आहे. कृष्णा कारखाना, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट काॅंग्रेसच्या काळात उभे राहिले अन् हे महाशय विचारताहेत काॅंग्रेसने काय केले? अशा यशवंतराव मोहिते भाऊंच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल, असा घनाघातही त्यांनी यावेळी केला.