कराड/प्रतिनिधी : –
एका सामान्य कुटुंबातील माणूस शिक्षित झाला, त्याला ज्ञानाचे महत्त्व आणि ताकद समजली, तर तो समाजासह संपूर्ण देशाला प्रगतीपथावर ने होऊ शकतो. हे भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनप्रवासावरून दिसून येते. आज त्यांच्या विज्ञानवादी विचारांची देशासह जगाला गरज असून डॉ. अब्दुल कलाम हे खऱ्या अर्थाने एक ज्ञानदीप आहेत, असे प्रतिपादन शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी केले.
शिक्षकांना ग्रंथ भेट : समाजप्रबोधन सार्वजनिक वाचनालय, मलकापूर, ता. कराड येथे ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. प्रारंभी, वाचनालयाचे अध्यक्ष शेतीमित्र अशोकराव थोरात यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शाळेतील शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ भेट देण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल सौ. वैशाली शेवाळे यांनी केले. सूत्रसंचालन संचालक सदस्य सौ. रंजना काटवटे यांनी केले. उपाध्यक्षा सौ. सुरेखा खंडागळे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली. खजिनदार विशांत थोरात यांनी वाचनाचे फायदे स्पष्ट केले. मुख्याधिपिका सौ. एस. व्ही. भिसे यांनी ‘वाचाल तर वाचाल’ याचा अर्थ विशद केला. संचालक सदस्य सुधाकर शिंदे यांनी आभार मानले.
संस्थेच्या शाळांमध्येही उपक्रम : दरम्यान, हा उपक्रम श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आनंदराव चव्हाण विद्यालय मलकापूर, आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर, आदर्श प्राथमिक विद्यालय मलकापूर, प्रेमिलाकाकी चव्हाण कन्याशाळा, मलकापूर या शाळांतील एका वर्गावर राबवण्यात आला. कार्यक्रमास एम. पी. फराळे, सौ. वनिता येडगे, सचिन शिंदे, सौ. ज्योती शिंदे, हेमंत शिर्के, ग्रामस्थ, सभासद उपस्थित होते.