संतप्त मराठा समाजबांधवांची कराडमध्ये निदर्शने; अर्धा तास शिवतीर्थ दत्त चौकातील रस्ता रोखला
कराड/प्रतिनिधी : –
मराठा समाजाला तात्काळ 50 टक्क्यांच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देवून मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सोडवावे, अशी मागणी करत कराड तालुका मराठा समाजाच्या वतीने शिवतीर्थ दत्त चौकात आज सोमवारी सकाळी निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी सरकार व लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
अर्धा तास वाहतूक धरली रोखून : मराठा समाजबांधवांनी शहरातील सर्वात वर्दळीचा शिवतीर्थ दत्त चौकातील रस्ता अर्धा तास रोखून धरत प्रांताधिकारी, तसेच तहसीलदार यांनी दत्त चौकामध्ये येऊन आमचे निवेदन स्विकारण्याची भूमिका संतप्त मराठा समाजबांधवांनी घेतली.
…त्यामुळे वाढला तणाव : निवेदन स्विकारण्याची प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी शिवतीर्थ दत्त चौकामध्ये येण्याची विनंती करूनही बराच वेळ प्रशासनाचे कोणीही अधिकारी आंदोलनस्थळी फिरकले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा समाजबांधवांनी त्याच ठिकाणी रस्त्यावर ठाम मांडले. त्यानंतर नायब तहसीलदार निवेदन स्वीकारण्यासाठी दत्त चौकात आले. मात्र, प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी सदरचे निवेदन स्वीकारावे, या भूमिकेवर आंदोलक ठाम राहिले. दरम्यान, वाहतूक कोंडी वाढत गेली. त्यावेळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी पोलिसांनी आंदोलकांना तहसील कार्यालयात जावून निवेदन देण्याची विनंती केली. तरीही आंदोलक ऐकायला तयार नसल्याने अखेर पोलीसंनीन आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याने तणाव वाढला. परिणामी, आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या दिला.
तहसीलदारांनी स्वीकारले निवेदन : आंदोलकांचा पवित्र पाहता अखेर तहसीलदार कल्पना ढवळे यांनी स्वतः शिवतीर्थ दत्त चौकात येऊन मराठा समाजबांधवांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारले. दरम्यान, भेदा चौक व कोल्हापूर नाका रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत केली.
मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष : मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण सुरू केले असून त्यांची प्रकृती खालवत आहे. तरीही सरकार मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने कराड तालुका मराठा समाजाच्या वतीने सोमवार, दि. 23 रोजी सकाळी 11 वाजता शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास अभिवादन करून निदर्शने केली.
डॉक्टर व विद्यार्थांसाठी रस्ता खुला : या रस्ता रोकोदरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत डॉक्टर व शालेय विद्यार्थी आडकल्याचे लक्षात येताच आंदोलकांनी डॉक्टर व विद्यार्थांना रस्ता खुला करून दिला.
तर… मोठी किंमत चुकवावी लागेल : आंदोलकांनी सरकार, विरोधी पक्ष व सर्वच लोकप्रतिनिधी, आमदारांविरोधात जोरदार घोषणाबजी केली. तसेच वारंवारच्या उपोषणांमुळे मनोज जरांगे-पाटील यांच्य्या प्रतृतीचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. तरीही सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे जर मनोज जरांगे-पाटील यांच्या केसालाही धक्का लागला, तर सरकारला याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही यावेळी मराठा आंदोलकांनी दिला आहे.