अध्यक्ष राजन वेळापुरे यांची 15 टक्के लाभांशाची घोषणा; संस्थेचा 277 कोटींचा एकत्रीत व्यवसाय, तीन तपांची समृद्ध अर्थपूर्ण वाटचाल
कराड/प्रतिनिधी : –
श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड या संस्थेची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन राजन वसंतराव वेळापुरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उत्साहात पार पडली. पतसंस्थेला या वर्षात 2 कोटी 75 लाख 58 हजारचा 395 पैसे 76 एवढा निव्वळ नफा झाला आहे. सभासदांना 15 टक्के विक्रमी लाभांश जाहीर करुन सभासदांच्या सेव्हिंग्ज ठेव खात्यावर लाभांश जमा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
बाळासाहेबांचे संस्थेच्या यशस्वी वाटचालीत योगदान : प्रारंभी, संस्थेचे संस्थापक चेअरमन, कालिका कुटुंबजनक स्व. गजानन (बाळासाहेब) बंडोबा मोहिरे व संस्थेच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेच्या आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीत गजानन (बाळासाहेब) मोहिरे यांचे मोठे योगदान असल्याचे संस्थेचे संस्थापक मुनीर बागवान सावकार यांनी सांगितले.
277 कोटींचा एकत्रित व्यवसाय : श्री कालिकादेवी पतसंस्थेने तीन तपांची समृद्ध विकासाची अर्थपूर्ण वाटचाल संस्थेचे कुटुंब प्रमुख मुनीर बागवान सावकार व संस्थेचे कार्यलक्षी संचालक विवेक वेळापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. संस्थेने 277 कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण करून सभासदांच्या हितासाठी अनेक नविन सोयी, सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
सर्व ठराव सर्वानुमते मंजूर : देशातील सहकार मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील सहकार विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. देशाच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीमध्ये सहकार क्षेत्राचा फार मोठा वाटा आहे. सहकारातील फायदा हा सभासदांचा असतो, हे सहकाराचे वेगळेपण आहे. सभेत सर्व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती : सभेस उपाध्यक्ष अनिल सोनवणे, संचालक अरुण जाधव, प्रा. अशोक चव्हाण, डॉ. संतोष मोहिरे, डॉ. जयवंत सातपुते, शरदचंद्र देसाई, राजेद्रकुमार यादव, सुरेश भंडारी, निरंजन मोहिरे, श्रीमती जयाराणी जाधव, सौ. सीमा विभुते, तज्ञ संचालक सुरेश कोळेकर, तसेच सातारा शाखा सल्लागार औदुंबर कासार, मारुती सावंत, सी. ए. शिरीष गोडबोले, संस्थापक संजय मोहिरे यांच्यासह संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.