पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गुरुदत्त कॉलनीत रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन
कराड/प्रतिनिधी : –
सैदापूर/विद्यानगरचे नागरीकरण दिवसेंदिवस वाढतच असून मूलभूत सोयी, सुविधांसाठी लोकांच्या अपेक्षाही वाढत आहेत. त्या झपाट्याने पूर्ण होण्यासाठी सैदापूरला नगरपंचायतीशिवाय पर्याय नाही, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
विद्यानगर (सैदापूर) येथील गुरुदत्त कॉलनीत दहा लाखांच्या आमदार निधीतून होणाऱ्या रस्ता काँक्रीटीकरणकामाचे भूमिपूजन आ. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी रयत कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, उपाध्यक्ष नितेश जाधव, तालुका खादी ग्रामोद्योगचे शिवाजी जाधव, माजी उपसरपंच सचिन पाटील, दत्तात्रेय जाधव, राजेंद्र जाधव, तानाजी माळी, विवेक जाधव, धनाजी जाधव, सतिश जाधव, वैशाली जाधव, आदित्य काळभोर आदींसह कॉलनीतील नागरिक उपस्थित होते.
माझ्या राजकारण, समाजकारणात सैदापुरचा मोठा वाटा : आ. चव्हाण म्हणाले, माझ्या राजकारण व समाजकारणात सैदापूरचा मोठा वाटा आहे. माजी सरपंच आनंदराव जाधव व विठ्ठलराव जाधव यांनी अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसला साथ दिली. त्यांच्यासह संपूर्ण सैदापूर चव्हाण कुटुंबीय काँग्रेसच्या पाठीशी राहिले. त्या माध्यमातून सैदापूरचा विकास करण्याचे भाग्य मला लाभले.
आणखी लागेल तेवढा निधी देऊ : मुख्यमंत्री असतानाही सैदापूर, विद्यानगरसाठी मोठ्या प्रमाणात निधी देता आल्याचे समाधान आहे. गेल्या पाच वर्षांतही मागे त्या विकासकामांसाठी निधी दिला आहे. यापुढेही सैदापूर व विद्यानगरसाठी लागेल तेवढा निधी दिला जाईल.
ग्रामपंचायतीपेक्षा नगरपंचायतीचीच आवश्यकता : सैदापूर हे कराड शहरालगतचे उपनगर असल्यामुळे सैदापूरला नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे विकासाची भूकही मोठ्या प्रमाणात आहे. ती पूर्ण करायची असेल, तर यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सैदापूरला ग्रामपंचायतीपेक्षा नगरपंचायतीची आवश्यकता असून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकेल. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही आ. चव्हाण यांनी यावेळी केले.
रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन : यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. याप्रसंगी कॉलनीतील संदीप नामदेव जाधव, संभाजी निकम, सुदामा कुंडले, अशोक निकम, रमेश गायकवाड, नवनाथ शिंदे, प्रताप साळुंखे, पंकज पाटील, सदाशिव पाटील, श्री. भाकरे, श्री. इंगवले, श्री. पवार, श्री. शिंदे, निजाम काझी आदी उपस्थित होते. नितेश जाधव यांनी स्वागत केले. उदय थोरात यांनी आभार मानले.