‘रयत’चे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते नूतन इमारतीचे लोकार्पण; ग्रामस्थांच्या प्रयत्नांचे केले कौतुक
कराड/प्रतिनिधी : –
कर्मवीर अण्णांनी काले येथे उभारलेल्या महात्मा गांधी विद्यालयाच्या नूतन इमारत वास्तूचा प्रस्ताव ग्रामस्थांनी दिला होता. त्यावेळी त्यांना मी 20 लाखांची लोकवर्गणी गोळा करायला सांगितली. त्यांनी त्यापेक्षा जास्त निधी उभारला. त्यात संस्थेने मोठी भर घालून अत्यंत सुंदर नूतन वास्तू उभारली. आता याठिकाणी आधुनिक संगणक कक्ष, प्रयोगशाळा, प्रशस्त सभागृह आदी अत्याधुनिक सुविधा उभारणीसाठी संस्थेतर्फे आणखी एक कोटींचा निधी देण्याची घोषणा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खा. शरद पवार यांनी केली.
काले, ता. कराड येथे लोकसहभाग व रयत शिक्षण संस्थेच्या सहकार्यातून उभारण्यात आलेल्या महात्मा गांधी विद्यालयाच्या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा संस्थेचे अध्यक्ष, खा. शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, संघटक डॉ. अनिल पाटील, सचिव विकास देशमुख, माजी खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, विश्वजीत कदम, संस्थेचे संचालक अॅड. रविंद्र पवार, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के, संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, विभागीय अध्यक्ष संजीव पाटील, शाळेचे पहिले विद्यार्थी आर. एम. कोळी, कालेतील विकास पाटील, अजित देसाई, संजय देसाई, सागर देसाई, के. एन. देसाई, सौरभ कुलकर्णी, सज्जन साळुंखे, विजय यादव, विक्रम खटावकर, पाडुरंग पाटील, वसंतराव पाटील आदी उपस्थित होते.
दोन महिन्यांनी राज्यातील परिस्थिती बदलेल : खा. पवार म्हणाले, राज्यात आमचे सरकार होते, त्यावेळी तत्कालीन अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण रयत शिक्षण संस्थेचा उचित सन्मान करण्यासाठी मोठ्या निधीची तरतूद बजेटमध्ये करण्याची सूचना केली होती. त्यानुसार अजित पवार यांनी तब्बल पाच कोटींची तरतूद केली होती. त्यातील तीन कोटी रुपये संस्थेकडे वर्ग करण्यात आले आहेत. दरम्यानच्या काळात परिस्थिती बदलल्याने उर्वरित दोन कोटींचा निधी अद्याप प्रलंबित आहे. मात्र, आता दोन महिन्यांनी आपण सर्वजण परिस्थिती बदलाल. त्यानंतर राहिलेल्या निधी पूर्ण करून त्याचा उपयोग संस्थेसाठी करण्यात येईल.
आधुनिकतेची कास धरूया : विद्यालयाची चांगली वास्तू उभी राहिली आहे. सर्व शिक्षकही आत्मीयतेने शिकवत आहेत, ही चांगली बाब आहे. परंतु, आता आधुनिकतेचा कास धरून विद्यालयातील मुले, मुली देशपातळीवर कसे चमकतील, या दृष्टीने नवनवीन उपक्रम हाती घेण्याची गरज असल्याचेही खा. शरद पवार यांनी सांगितले.
काले गावाला मोठा इतिहास : काले गावाला मोठा इतिहास. कालेसह परिसरातील शेकडो स्वातंत्र्यसैनिकांनी संघर्ष केला. येथील शांताराम काकडे आणि इस्माईल मुल्ला यांची आठवण करणे क्रमप्राप्त असून त्यांची आठवणही त्यांनी
कर्मवीर अण्णांवर महात्मा गांधींचा प्रभाव : कर्मवीर अण्णा महात्मा गांधीजींच्या विचारसरणीचे होते. त्यांच्या नावाने शाळा सुरू करण्याचा संकल्प अण्णांनी केला होता. त्यानुसार त्यांनी अनेक शाळाही सुरू केल्या, त्यामध्ये काले गावातील शाळेचा समावेश आहे.
इमारत उभारणीत मोलाचे योगदान :आज याठिकाणी शाळेची नूतन इमारत उभी करण्यासाठी विकास पाटील, ग्रामस्थ, तसेच संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, आजी-माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या बहुमोल सहकार्याचाही आ. शरद पवार यांनी विशेष उल्लेखही केला.
दोन कोटींपेक्षा जास्तीचा निधी : राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी बांधकामास दिला. रयत शिक्षण संस्थेकडून 55 लाख, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज 20 लाख आणि रयत शिक्षण संस्था व महात्मा गांधी विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी, रयत सेवक, शिक्षक, हितचिंतक व शालेय बाल गोपाळांनी आपल्या खाऊंच्या पैसे असे मिळून सुमारे 72 लाखांचा निधी दिला. अशा एकूण दोन कोटींपेक्षा जास्त निधीतून ही देखणी वस्तू उभी राहिली असल्याचे संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी सांगितले.
कर्मवीर अण्णांच्या जंयतीदिनीच लोकार्पण : रविवार, दि. 22 रोजी डॉ. कर्मवीर पाटील यांची 137 वी जंयती आहे. त्यानिमित्ताने त्याच दिवशी महात्मा गांधी विद्यालयाचे उदघाटन होत आहे, याचा आनंद असल्याचे खा. शरद पवार व चंद्रकांत दळवी यांनी सांगितले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र नांगरे-पाटील यांनी प्रास्तविक केले. विकास पाटील व संस्थेचे संघटकअनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला कालेसह परिसरातील ग्रामस्थ, रयतप्रेमी, आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.