सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला मिळाला ‘आशेचा किरण’

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

उपसंचालकपदी किरण जगताप यांची नियुक्ती; इको टुरिझम बहरण्यासाठी लागणार हातभार

कराड/प्रतिनिधी : –

जैवविविधतेची समृद्धी लाभलेला महाराष्ट्रातील ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्प’ जगाच्या नकाशावर अधोरेखित झाला आहे. नुकतेच महाराष्ट्र शासनाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला इको टुरिझम विकासासाठी 82 कोटी रुपये मंजूर केले आहेत. अशात भारतीय वन सेवेतील गाढा अनुभव व कर्तव्यदक्ष वन अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केलेल्या किरण जगताप यांची सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालकपदी नियुक्ती झाल्याने येथील इको टुरिझम वृद्धिंगत होण्यासाठी श्री. जगताप यांच्या रूपाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला मिळाला एकप्रकारे ‘आशेचा किरण’ मिळाला आहे.

क्रिएटिव्ह नेचर फ्रेंड्स संस्थेकडून स्वागत : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालकपदी नुकतीच किरण जगताप यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्धल क्रिएटिव्ह नेचर फ्रेंड्स, कराड या पश्चिम घाट क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष रोहन भाटे, नाना खामकरहेमंत केंजळे यांनी किरण जगताप यांना भेटून त्यांचे स्वागत केले. तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

कर्तव्यदक्ष वन अधिकारी : किरण जगताप हे भारतीय वन सेवेचे अधिकारी असून त्यांनी आतापर्यंतच्या त्यांच्या सेवा कालावधीत अत्यंत उत्कृष्ट सेवा बजावली असून एक कर्तव्यदक्ष वन अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे.

उल्लेखनीय सेवा : किरण जगताप हे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा याठिकाणी ते कार्यरत होते. तसेच तेलंगाना व महाराष्ट्र राज्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या टिपेश्वर अभयारण्याचेही ते काही काळ प्रमुख म्हणून काम पाहत होते.

अनुभव व कौशल्याचा होणार फायदा : किरण जगताप यांचा भारतीय वन सेवेतील अनुभव आणि त्यांनी निभावलेली मोठी जबाबदारी पाहता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालकपदी त्यांनी नियुक्ती झाल्याने त्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा नक्कीच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालाही फायदा होणार आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे इको टुरिझम विकासाची जबाबदारी : महाराष्ट्र शासनाने नुकतेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला इको टुरिझम विकासासाठी 82 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्या कामाची अंमलबजावणी प्रामुख्याने किरण जगताप यांच्या देखरेखीखाली होणार आहे.

महाराष्ट्र शासनाने टाकलेली ही जबाबदारी आपल्या कर्तव्यदक्षतेची ही पोहोचपावती असल्याचे मत किरण जगताप यांनी रोहन भाटे, नाना खामकर व हेमंत केंजळे यांच्याशी बोलताना व्यक्त केले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!