वाढीव भागातील रहिवाशांचे मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन
कराड/प्रतिनिधी : –
शहरात हद्दवाढ झालेल्या भागातील रहिवाशांनी कराड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर आंदोलनाचा पवित्रा गुरुवारी घेत ठिय्या दिला. हा भाग जवळपास पंधरा वर्षांपासून कराड नगरपालिकेत समाविष्ट होऊनही अद्याप या भागाला ऍप्रोच रस्ता नसल्याने येथील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. सदर रस्त्याची वारंवार मागणी करूनही त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने अखेर संतप्त रहिवाशांनी रस्त्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना दालनाबाहेर ठिय्या देत आंदोलन केले.
या आंदोलनात वाढीव भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काही काळ मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या दिल्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन पालिकेला सादर करण्यात आले.
नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : अनेकवेळा वाढीव भागातील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे रस्त्याची मागणी केली आहे. मात्र, नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने गुरुवार, दि. 19 रोजी या भागातील रहिवाशांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या देत आंदोलन केले. यावेळी रहिवाशांनी या भागात रस्त्याची सुविधा नसल्याने घरी पाहुणे सुद्धा येत नसल्याचे सांगितले.
महिला व लहान मुले असुरक्षित : वाढीव भागातील काही ठिकाणी लाईटची सुविधा नसल्याने महिला रात्रीच्या वेळेस या भागातून ये-जा करू शकत नाही. तसेच लहान मुलांनाही धोका संभवत असून याठिकाणी सुरक्षेची वाणवा आहे.
पालिका अधिकाऱ्यांकडून आंदोलकांची मनधरणी : येथील रहिवाशांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरच ठिय्या देत आंदोलन केल्यानंतर पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आंदोलकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. तसेच मुख्याधिकारी परगावी असल्याने त्यांच्यावतीने नगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी आंदोलनाचे निवेदन स्वीकारले.
आंदोलन तात्पुरते स्थगित : याप्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांनी वाढीव भागातील नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्याचबरोबर आज शुक्रवारी पुन्हा मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येण्याची पालिका अधिकाऱ्यांनी विनंती केली. यावर आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांनी आमच्या परिसरामध्ये प्रत्यक्ष येऊन रस्त्याच्या अवस्थेची पाहण्याची करण्याची मागणी करत सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
अन्यथा, तीव्र आंदोलन : येणाऱ्या काळात आम्हाला अॅप्रोच रस्ता मिळाला नाही, तर या भागातील नागरिक आक्रमक होऊन तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही आंदोलनही यावेळी दिला.
