समितीतर्फे एनएएसी (B +) मानांकन; महाविद्यालयाच्या शिरपेचात मनाचा तुरा
कराड/प्रतिनिधी : –
कराड तालुक्यासह लगतच्या तालुक्यांतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना श्री संतकृपा शिक्षण संस्थेने मोठे शैक्षणिक दालन उपलब्ध करून दिले आहे. आज या इन्स्टिट्यूटमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी देशासह जगभरात उच्च पदावर कार्यरत आहेत. श्री संतकृपा शिक्षण संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या दर्जेदार शिक्षणास व सोयी-सुविधांची नोंद घेत नुकतीच ‘नॅक’ समितीने दखल घेत श्री संतकृपा शिक्षण संस्थेला एनएससी (B +) मानांकन देत इन्स्टिट्यूटच्या गुणवत्तेवर मोहर उमटवली आहे.
घोगाव, ता. कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेच्या समितीने (नॅक) नुकतीच भेट देवून दोन दिवस महाविद्यालयाचे विविध स्तरावरील मुल्यांकन केले. त्यानुसार नॅक समितीने श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयास एनएएसी बी प्लस (NAAC B+) मानांकन दिले आहे. याबाबतचे पत्र शुक्रवार, दि. 13 रोजी महाविद्यालयास प्राप्त झाले आहे.
राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषदेस अहवाल सादर : नॅक समितीने 4 व 5 सप्टेंबरला महाविद्यालयाशी संबंधित शिक्षक, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी आदी घटकांबरोबर संवाद साधून महाविद्यालयाविषयी त्यांच्या अपेक्षा व मते जाणून घेतली. महाविद्यालयात आवश्यक शैक्षणिक सुविधा, प्रयोगशाळा, ग्रंथालय, तांत्रिक सुविधा, इंटरनेट सुविधा आदी बाबींची शहानिशा करून महाविद्यालयाचे मूल्यांकन केले. याबाबतचा गोपनीय अहवाल राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेस सादर केला. त्यानुसार महाविद्यालयाच्या गुणवत्तेविषयी प्राप्त गुणांकनानुसार बी प्लस (B+) श्रेणी मिळाली आहे. हे मानांकन पाच वर्षांसाठी आहे.
दीड वर्षांच्या अथक परिश्रमाला यश : महाविद्यालयाला एनएएसी मान्यता मिळण्यासाठी गेले दीड वर्ष अथक परिश्रम घेणारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, एनएएसी कॉर्डिनेटर सुधीर गायकवाड, आयक्यूएसीचे कॉर्डिनेटर संतोष पतंगे, बी.टेकच्या विविध विभागाचे प्रमुख, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे या यशामध्ये मोलाचे योगदान आहे. या त्यांच्या परिश्रमाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, उपाध्यक्षा अनुराधा गांधी, सचिव प्रसून जोहरी, खजिनदार प्राजक्ता जोहरी, संचालक अशोक जोहरी यांनी प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व आजी, माजी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.
ही मान्यता आमच्या संस्थेच्या कठोर परिश्रमाचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी दिलेल्या वचनबद्धतेचे फलित आहे. आम्ही विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण व प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करत राहू.
– प्रसून जोहरी
(सचिव, श्री संतकृपा इन्स्टिट्यूट)
या मानांकनामुळे महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेला बळ मिळाले असून भविष्यात आणखी प्रगती करू
– डॉ. स्वानंद कुलकर्णी
(प्राचार्य, श्री संतकृपा इन्स्टिट्यूट)