कामगार मंत्र्यांच्या उपस्थितीत बांधकाम कामगार संमेलन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

शिंदेवाडी – विंग शुक्रवारी आयोजन; लाभार्थींना होणार साहित्य व कामगारांच्या मुलामुलींना शिष्यवृत्ती वितरण

कराड/प्रतिनिधी : –

भारतीय जनता पक्ष कराड दक्षिणच्या वतीने शुक्रवारी, दि. 20 रोजी शिंदेवाडी – विंग, ता. कराड येथे राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत भव्य बांधकाम कामगार संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते पात्र लाभार्थींना साहित्य वितरण करण्यात येणार आहे. याप्रसंगी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले प्रमुख उपस्थिती असणार आहे.

बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेचा लाभ : महायुती सरकारच्या माध्यमातून व महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी नोदंणीकृती बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य संच पेट्यांचे वितरण केले जाते. तसेच पात्र लाभार्थींना भांडी व बांधकाम कामगारांच्या मुलामुलींना शिष्यवृत्तीचे वितरण केले जाते.

कराड दक्षिणमध्ये विशेष प्रयत्न : बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कराड दक्षिणमध्ये भाजपतर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत. भाजप कामगार आघाडीच्या माध्यमातून अनेक पात्र लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी विशेष अभियानही राबविले जात आहे.

कामगार मंत्र्यांच्या हस्ते वितरण : बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते या बांधकाम कामगार संमेलनात साहित्याचे वितरण केले जाणार आहे. तसेच यावेळी बांधकाम कामगारांच्या मुलामुलींना शिष्यवृत्तीचे वितरणही करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला कराड दक्षिणमधील बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप कामगार मोर्चाचे तालुकाध्यक्ष रुपेश देसाई यांनी केले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!