कालेत शरद पवार यांच्या हस्ते होणार रविवारी उद्घाटन; संस्थेला 105 वर्षे, तर शाळेला 76 वर्षे पूर्ण
कराड/प्रतिनिधी : –
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 4 आक्टोबर 1919 मध्ये शिक्षणाचा श्रीगणेशा करत कराड तालुक्यातील काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. तसेच संस्थेचे पहिले वसतिगृहही सुरू केले. तर 1 ऑगस्ट 1948 रोजी याठिकाणी महात्मा गांधी विद्यालयाची स्थापना करण्यात आली. 2023 मध्ये या शाळेचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.
एक दुग्धशर्करा योग : शाळेची इमारत जीर्ण झाल्याने याठिकाणी सुमारे 2 कोटींहून अधिक रकमेकच्या लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या भव्य-दिव्य शाळेच्या नूतन इमारतीचे संस्थेचे अध्यक्ष, खा. शरदचंद्र पवार यांच्या हस्ते व विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रविवार, दि. 22 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीदिनीच लोकार्पण होत आहे, हा एक दुग्धशर्करा योग आहे.
शाळा उभारणीसाठी तब्बल 2 कोटींची लोकवर्गणी : काले येथील शाळेच्या नूतन इमारतीसाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी शरदचंद्र पवार यांनी दिला आहे. तसेच रयत शिक्षण संस्थेकडून 55 लाख, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड यांच्याकडून 20 लाख, रयत शिक्षण संस्थेचे व महात्मा गांधी विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी, रयत सेवक, शिक्षक, हितचिंतक व शालेय बाल गोपाळांनी दिलेले आपल्या खाऊंच्या पैसे असे मिळून सुमारे 72 लाखाचा निधी दिला आहे. या सर्व निधीतून सुमारे 2 कोटी रुपयांहून अधिक रकमेची भव्य-दिव्य अशी शाळेची इमारत उभारण्यात आली आहे.
2019 मध्ये बांधकामास सुरुवात : महात्मा गांधी विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामाला 2019 मध्ये सुरुवात झाली होती. सध्या शाळेचे बांधकाम पूर्ण झाले असून अत्यंत देखणी इमारत उभी राहिली आहे. या नूतन इमारतीचे रविवारी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंतीचे औचित्य साधून त्याच दिवशी विद्यालयाच्या प्रांगणात दुपारी 3 वाजता संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते उद्धाटन सोहळा साजरा होत आहे.
मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी आहेत. तसेच संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, माजी खा. श्रीनिवास पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के, संस्थेचे व्हा. चेअरमन भगीरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य खा. रामशेठ ठाकूर, संस्थेचे सचिव विकास देशमुख, विभागीय चेअरमन संजीव पाटील यांच्यासह संस्थेचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
तरी सातारा जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेचे सर्व आजी-माजी विद्यार्थी, देणगीदार, हितचिंतक यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र नांगरे-पाटील व स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी केले आहे.