संस्कृतीच्या मुळाशी असलेल्या ‘संस्कृत’ला संरक्षणाची गरज 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

जनगणनेत ‘संस्कृत’चा समावेश करा; भाषासंवर्धनासाठी समाजाला आवाहन, प्राचीन भाषेच्या अस्तित्वासाठी जाणीवपूर्वक नोंद महत्त्वाची – नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज 

कराड/प्रतिनिधी : – 

भारताची आगामी जनगणना मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होणार असून, या प्रक्रियेदरम्यान प्रत्येक नागरिकाने आपल्या परिचित भाषांमध्ये ‘संस्कृत’चा जाणीवपूर्वक समावेश करावा, असे प्रभावी आवाहन धारेश्वर मठाचे मठाधिपती पूज्य आदिश्वर नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांनी केले आहे.

संदेश : संस्कृत ही केवळ एक भाषा नसून, भारतीय संस्कृतीचे मूळ अधिष्ठान असल्याने तिचे अस्तित्व टिकवण्यासाठी जनतेच्या सहभागाची गरज असल्याचा त्यांनी ठाम संदेश धारेश्वर महाराज यांनी दिला आहे.

…ती ‘अपरिचित’ नाही : भारत सरकारच्या जनगणना मोहिमेदरम्यान अधिकारी, कर्मचारी नागरिकांकडून मातृभाषा, तसेच ज्ञात असलेल्या इतर भाषांची माहिती गोळा करतात. या प्रक्रियेत अनेकदा लोक संस्कृतचा उल्लेख टाळतात. मात्र, दैनंदिन जीवनातील प्रार्थना, मंत्र, श्लोक, पूजा-विधी यामध्ये संस्कृतचा वापर होत असल्याने ती ‘अपरिचित’ नाही, हे नागरिकांनी लक्षात घ्यावे, असे धारेश्वर महाराज यांनी स्पष्ट केले.

लुप्त भाषा घोषित होण्याचा धोका : मागील जनगणनेनुसार देशात संस्कृत भाषिकांची संख्या सुमारे दोन लाखांपर्यंत मर्यादित असल्याचे दिसून आले. याउलट इतर परकीय भाषांची नोंद अधिक प्रमाणात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, संस्कृतची संख्या कमी असल्याचे चित्र कायम राहिल्यास भविष्यात ती ‘लुप्त भाषा’ म्हणून घोषित होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दीर्घकालीन परिणाम : संस्कृत भाषा लुप्त घोषित झाल्यास, प्राचीन वेद, पुराणे, धर्मग्रंथ यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. संशोधन व प्रकाशन कार्यावर मर्यादा येऊ शकतात. सांस्कृतिक परंपरा आणि पूजा पद्धतींवर दीर्घकालीन परिणाम अशा संभाव्य परिणामांकडेही धारेश्वर महाराजांनी लक्ष वेधले.

जीवनात रुजलेली भाषा : आपण रोजच्या संभाषणात आणि व्यवहारात नकळत अनेक संस्कृत शब्द वापरतो. नमस्ते, संध्याकाळ, आरती, नैवेद्य, प्रदक्षिणा, आहार, जलपान, अल्पोपहार, संग्रह, सर्व इत्यादी शब्द हे त्याचेच उदाहरण आहेत. यावरून संस्कृत ही ‘मृत’ नसून आपल्या जीवनात रुजलेली भाषा आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

भाषिक जाणीव जागवण्याची गरज

जनगणनेदरम्यान फक्त मातृभाषाच नव्हे, तर ज्या भाषा समजतात किंवा वापरात आहेत, त्या सर्वांची अचूक नोंद करणे आवश्यक आहे. संस्कृतसह हिंदी, कन्नड, गुजराती, तेलुगू आदी भाषांचा समावेश करावा, असेही आवाहन करण्यात आले. 

समाजाची सामूहिक जबाबदारी 

संस्कृत ही भारतीय भाषांची जननी मानली जाते. तिचे जतन आणि संवर्धन ही केवळ शासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ‘जाणीवपूर्वक केलेले छोटे प्रयत्नही मोठा बदल घडवू शकतात,’ असा संदेश देत धारेश्वर महाराजांनी नागरिकांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. 

आगामी जनगणना ही केवळ लोकसंख्येची मोजणी नसून, भाषिक आणि सांस्कृतिक ओळख जपण्याची संधी आहे. संस्कृतचा जाणीवपूर्वक समावेश करून तिच्या अस्तित्वाला बळ देणे, हीच खरी संस्कृतीप्रती कृतज्ञता ठरेल. 

– पूज्य आदिश्वर नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज (धारेश्वर मठ, धारेश्वर (मारूल) ता. पाटण) 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!