श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त धार्मिक सोहळा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आगाशिवनगरात ८ ते १५ एप्रिलदरम्यान नामसप्ताह, गुरूचरित्र पारायण व विविध यज्ञ कार्यक्रम

कराड/प्रतिनिधी : –

श्री स्वामी समर्थ प्रधान सेवा केंद्र, आगाशिवनगर (शहर दरबार), ता. कराड यांच्यावतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त भव्य धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. बुधवार, दि. ८ एप्रिल ते बुधवार दि. १५ एप्रिल या कालावधीत अखंड नामजप, जप, पारायण सप्ताह, तसेच हवनयुक्त श्री गुरूचरित्र पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध धार्मिक कार्यक्रम : या सप्ताहात दररोज सकाळी ८ वाजता भूपाळी आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, नित्यसेवांमध्ये गुरूचरित्र वाचन, विशेष यज्ञ, दुर्गा सप्तशती व स्वामी चरित्र पठण, महाआरती, प्रदक्षिणा व विविध धार्मिक कार्यक्रमांचा समावेश आहे. सायंकाळी महाआरतीनंतर विविध विषयांवर मार्गदर्शन व भक्तिपूर्ण कार्यक्रम होणार आहेत.

स्वरूप : सप्ताहातील प्रमुख कार्यक्रमांमध्ये दि. ८ रोजी ग्रामदैवत सन्मान व मंडल मांडणी, दि. ९ रोजी मंडल स्थापना, अग्निस्थापना व स्थापित देवता हवन, दि. १० रोजी श्री गणेश याग व मनोबल याग, दि. ११ रोजी चंडी याग, दि. १२ रोजी श्री स्वामी याग, दि. १३ रोजी श्री गिताई याग, दि. १४ रोजी रुद्र व मल्हारी याग आणि दि. १५ रोजी वली पूर्णाहुतीसह सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे.

मुख्य सोहळा : बुधवार दि. १५ रोजी सकाळी १० वाजता श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीचा मुख्य सोहळा संपन्न होणार असून, या दिवशी विशेष पूजन, अखंड नामजप आणि यज्ञसांगता पार पडणार आहे. या धार्मिक सप्ताहात महिला व पुरुष भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सेवा संधी : गुरूचरित्र ग्रंथ पारायणासाठी स्वतंत्र वेळापत्रक ठेवण्यात आले असून, सकाळ व सायंकाळी भाविकांना सेवा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वेळ व ठिकाण : हा कार्यक्रम श्री स्वामी समर्थ प्रधान सेवा केंद्र, आगाशिवनगर (श्री दत्त मंदिर परिसर), ता. कराड येथे होणार आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!