महाराष्ट्र केसरी विजेती वेदांतिका पवारचा पंचायत समितीकडून सन्मान; महिला कुस्तीला चालना देण्यावर भर
कराड/प्रतिनिधी : –
तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कराड पंचायत समितीच्या वतीने ‘सभापती केसरी’ कुस्ती स्पर्धा सुरू करण्याचा प्रस्ताव लवकरच अंतिम केला जाणार असल्याची माहिती उपसभापती अनिता वेताळ यांनी दिली. स्थानिक स्तरावर प्रतिभावान खेळाडूंना संधी मिळावी आणि कुस्ती परंपरेला नवे बळ मिळावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंचायत समितीतर्फे सत्कार : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ७२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून कराडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचणाऱ्या वेदांतिका अतुल पवार हिचा पंचायत समितीतर्फे बुधवारी उपसभापती अनिता वेताळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
आजच्या मुली सर्वच क्षेत्रांत अव्वल : हजारमाची (ता. कराड) सारख्या ग्रामीण भागातून पुढे येत राज्यस्तरावर यश मिळवणाऱ्या वेदांतिकाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे सांगताना उपसभापती वेताळ म्हणाल्या, आजच्या काळात मुली सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. वेदांतिका ही त्याचे उत्तम उदाहरण आहे. अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ठोस उपक्रम राबविण्याची गरज आहे.
मार्गदर्शन : वेदांतिका हिला हिंदकेसरी संतोष वेताळ, तसेच अतुल पवार यांचे मार्गदर्शन लाभले असून, तिच्या सातत्यपूर्ण सरावामुळेच हे यश मिळाले आहे. तिने यशाचा आलेख आणखी उंचावत ऑलिम्पिक पदकापर्यतची मजल मारून गावासह जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, अशी आशाही उपसभापती वेताळ यांनी व्यक्त केली.
मनाचा किताब मिळवून देणार : सत्काराला उत्तर देताना वेदांतिका पवार यांनी, कुस्ती क्षेत्रात हिंदकेसरी संतोष वेताळ यांचे आपणास मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे सांगितले. तसेच मान्यवरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा सार्थ ठरवत आपण साताऱ्याला पहिली महिला महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा विश्वास व्यक्त केला.
मनोगत : मनोगतात पै. अतुल पवार यांनी वेदांतिका पवारच्या एकूणच कुस्ती कामगिरीचा आढावा घेत तिने कराड तालुक्यासह जिल्ह्याचा नावलौकिक वाढवल्याचे सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती : सुर्लीचे उपसरपंच कृष्णत मदने यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रताप क्षीरसागर, अरविंद यादव, सचिन वेताळ, पै. सुशांत ठेंगरे, कराड तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवछत्रपती पुरस्काराने गौरव व्हावा
सलग चौथ्यांदा सुवर्ण कामगिरी करणाऱ्या वेदांतिका पवारच्या यशाची दखल सातारा जिल्हा कुस्ती संघाने घ्यावी, अशी अपेक्षा पै. सतीश डांगे यांनी व्यक्त केली. योग्य संधी आणि पाठबळ मिळाल्यास ती राष्ट्रीय पातळीवरही चमक दाखवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच अत्यंत सन्मानाच्या शिवछत्रपती पुरस्काराने वेदांतिकाचा गौरव व्हावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.