जिल्हा परिषद झाकी, 2029 ला हिशोब चुकता करू

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

रामकृष्ण वेताळ; वडोली निळेश्वरमध्ये विजयी मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद

कराड/प्रतिनिधी : –

जिल्हा परिषदेची निवडणूक फक्त झाकी आहे; खरी लढत २०२९ मध्ये होणार आहे, त्यावेळी सर्वांचा हिशोब चुकता केला जाईल. काही अवैध धंदेवाले बढाया मारत आहेत. मी बोललो तर त्यांना पळता भुई थोडी होईल,’ असा सज्जड इशारा कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ यांनी दिला.

जाहीर विजयी सभा : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोपर्डे हवेली गटातून अपक्ष उमेदवार सौ. विद्या वेताळ या भरघोस मतांनी विजयी झाल्या. यानिमित्त दि. 17 रोजी वडोली निळेश्वर, ता. कराड येथे आयोजित विजयी सभेत ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकास सोसायटीचे चेअरमन सुरेश पाटील होते. यावेळी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सचिन नलवडे, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश कुंभार, माजी सरपंच बाळासो पवार, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष बजरंग पवार, सोसायटीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण, अॅड. महादेवराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

…तर पळता भुई थोडी होईल : सभेत बोलताना श्री. वेताळ म्हणाले, जिल्हा परिषदेची निवडणूक ही झाकी आहे. 2029 ला सर्वांचा हिशोब केला जाईल. काही अवैध धंदेवाले बढाया मारू लागलेत. मी तोंड उघडले तर पळता भुई थोडी होईल, अशा आपल्या खास शैलीत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

यशवंत विचारांची पाठराखण : या सभेमध्ये विजयी उमेदवार सौ. विद्या वेताळ यांनी, यशवंत विचारांची पाठराखण करण्यासाठी आणि कोपर्डे हवेली गटाचा सुसंस्कृतपणा जपण्यासाठी आपणाला मदत करणाऱ्या सर्व मतदार बंधू-भगिनींचे आभार मानून सदैव तुमच्या सेवेत राहील, अशी ग्वाही दिली.

विधानसभेच्या तयारीचा संदेश : अध्यक्ष सुरेश पाटील यांनी, 2029 च्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आजपासूनच तयारी करण्याचा संदेश सभेला जमलेल्या लोकांना दिला.

चित्र बदलूया : कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन परक्या ऐवजी घरच्यांची सोबत करूया आणि विधानसभेला चित्र बदलूया, असे सचिन नलवडे यांनी आवाहन केले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

उच्चांकी गर्दीची सभा : या विजयी सभेला कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमधून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. वडोली निळेश्वर गावच्या परिसरातील ही सर्वात उच्चांकी गर्दीची सभा असल्याचे बोलले जात होते.

प्रमुख उपस्थिती : या सभेस बाळासो पवार, श्रीरंग चव्हाण, रंगराव चव्हाण, भानुदास पोळ, प्रल्हाद भोसले, संजय पिसाळ, सचिन नांगरे, मा. उपसरपंच जालिंदर पवार, मा. उपसरपंच दयानंद पवार, ग्रामपंचायत सदस्य रमेश पवार, जगन्नाथ वाघमारे, भिकाजी वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

प्रास्ताविक व आभार : सभेचे प्रास्ताविक रोहित डुबल यांनी. तर सूत्रसंचालन श्री. तडाके सर यांनी केले. आभार बाळासो पवार यांनी मानले.

… तोपर्यंत पूलाखालून बरेच पाणी वाहून जाईल 

या सभेतील हे वाक्य भाजपमधील सत्ता संघर्ष यापुढेही कायम राहणार असल्याचे सूचक होते. यामुळे घरचा-बाहेरचा, आपला-परका असा वाद यापुढेही उफाळून येऊन 2029 पर्यंत पूलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे. या वादाचा परिणाम पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे. श्री. वेताळ यांनी विधानसभेची तयारी सुरू केल्याचे त्यातून स्पष्ट होत आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!