वर्षभरात कराडचा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुल प्रकल्प पुर्वात्वास

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आमदार डॉ. अतुल भोसले; आयपीएल सामन्यांचे लक्ष्य, कामाचा दर्जा व गतीवर भर

कराड/प्रतिनिधी : –

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुल प्रकल्पाचे काम वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने सुरू असून, त्याचे काम वर्षभरात पूर्णत्वास जाईल. हे संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. येथील सुविधा भविष्यात आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्यास सक्षम असाव्यात, या दृष्टीने नियोजन केले जात असल्याची माहिती आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

आढावा बैठक : नगरपालिकेचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी आणि नगरसेवक यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत संकुलाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कामाच्या प्रत्येक टप्प्यावर दर्जाबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, अशा स्पष्ट सूचना आमदार भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

उच्च गुणवत्ता राखण्यावर विशेष भर : बांधकाम साहित्य, विटांचा दर्जा, तसेच एकूण पायाभूत सुविधा या बाबींमध्ये उच्च गुणवत्ता राखण्यावर त्यांनी विशेष भर दिला. संकुलात आंतरराष्ट्रीय निकषांनुसार रनिंग ट्रॅक उभारला जात असून तो ऑलिंपिक मानकांशी सुसंगत आहे का?, याचीही तपासणी करण्यात आली.

तांत्रिक बाबींवर सखोल चर्चा : ट्रॅकसाठी वापरण्यात येणाऱ्या मॅटच्या दर्जाबाबत विविध नामांकित कंपन्यांची माहिती घेण्यात आली. तसेच पाच बॅडमिंटन कोर्ट उभारण्याचे नियोजन असून, राज्य व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा येथे आयोजित करता याव्यात, यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींवर सखोल चर्चा झाली.

नियमित पाठपुरावा : काम नियोजित वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी ठेकेदार कंपनीला ‘बार चार्ट’ सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दर महिन्याला प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश बांधकाम विभागाला देण्यात आले असून, त्यावर नगरपालिकेकडून नियमित पाठपुरावा केला जाणार आहे.

क्रीडा क्षेत्रात नवे स्थान : याशिवाय नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांची देखरेख समिती स्थापन करण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला. ‘प्रकल्प वेळबद्ध पद्धतीने पूर्ण करून कराडला क्रीडा क्षेत्रात नवे स्थान मिळवून देणे हा आमचा प्रयत्न आहे,’ असे आमदार भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले.

मान्यवरांची उपस्थिती : बैठकीस मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, जयवंतराव पाटील, विजय वाटेगावकर, अतुल शिंदे, शिवाजी पवार, एकनाथ बागडी, भरत पाटील यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी, तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.

क्रीडासंकुलाची पाहणी : बैठकीनंतर आमदार अतुल भोसले यांनी सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुल प्रकल्पाच्या ठिकाणी भेट देऊन कामाचे पाहणी केली.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!