शहराची स्वच्छता राखण्यासाठी दररोज मेहनत घेणाऱ्या महिला स्वच्छता कामगारांच्या स्वावलंबनाला चालना देणारा आदर्श उपक्रम महिला मर्चंटच्या कार्वेनाका शाखेच्यावतीने राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत संबंधित महिला कामगारांस वाहन वितरण करण्यात आले. या वाहनामुळे दैनंदिन कामासाठी ये-जा करणे अधिक सोयीचे होणार असून, वेळ व श्रमांची बचत होणार आहे. त्यामुळे कामातील अडचणी कमी होऊन तिच्या आर्थिक व सामाजिक स्वावलंबनास बळ मिळणार असल्याची भावना या महिला कामगाराने व्यक्त केली.
सामाजिक बांधिलकी : मर्चंट परिवाराच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांतर्गत आयोजित या कार्यक्रमाला संस्थेच्या संस्थापिका सौ. भारती मिनियार, चेअरमन सौ. कविता पवार, व्हाइस चेअरमन सौ. सुवर्णा सादिगले यांच्यासह संचालक मंडळ, बँक अधिकारी व सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सातत्यपूर्ण प्रयत्न : यावेळी बोलताना संस्थापिका सौ. भारती मिनियार म्हणाल्या, समाजातील तळागाळातील घटकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणणे हे संस्थेचे सामाजिक कर्तव्य आहे. गरजू घटकांना प्रत्यक्ष मदत करणारे उपक्रम राबविण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.
मकर संक्रांतीनिमित्त व्याजदराची योजना : संस्थेच्या आर्थिक वाटचालीची माहिती देताना सौ. मिनियारम्हणाल्या, सध्या संस्थेकडे २२७ कोटी रुपयांच्या ठेवी असून, १५८ कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील विविध भागांत ११ शाखांमधून संस्थेचे कामकाज सुरू असून, त्यापैकी नियोजित वास्तूसह ७ शाखा स्वमालकीच्या आहेत. संस्थेचा निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे. नववर्ष व मकर संक्रांतीनिमित्त ठेवींवर विशेष व्याजदराची योजना सुरू असून, १०१ दिवसांच्या मुदत ठेवीस १० टक्के व्याजदर दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
आवाहन : महिला उद्योजिकांसाठी कमी व्याजदरात कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, सभासदांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
भावना : या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, स्वच्छता कामगारांच्या सन्मानासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमास संचालिका सीमा कदम, अनुराधा पावसकर, सौ. जयश्री पाटील, शाखाप्रमुख अनिल कदम, अनिता सूर्यवंशी, रत्नप्रभा घोरपडे, विजया पाटील, अंजली बाकळे, कशिश मिनियार यांच्यासह सेवक उपस्थित होते.