कोपर्डे हवेलीचा विजय राज्यात गाजवा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

रामकृष्ण वेताळ; स्वाभिमान डिवचाल तर जनता माफ करणार नाही, कोपर्डे हवेलीच्या प्रचार सभेत इशारा

कराड/प्रतिनिधी : –

गेल्या पन्नास वर्षांत सत्तेत बसलेल्या धनदांडग्यांनी नेमका काय विकास केला, हे जनतेने अनुभवले आहे. आज आयारामांना उमेदवारी देऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय केला जात आहे. हा अन्याय केवळ रामकृष्ण वेताळ यांच्यावर नसून, प्रत्येक प्रामाणिक कार्यकर्त्यावर झालेला अन्याय आहे आणि ही भावना आज घराघरात पोहोचली आहे. त्यामुळेच कोपर्डे हवेलीतील अपक्ष उमेदवारांचा विजय आता निश्चित झाला असून, हा विजय राज्यात गाजवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ यांनी केले.

जाहीर प्रचारसभा : कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील अपक्ष उमेदवार सौ. विद्या वेताळ, कोपर्डे पंचायत समिती गणातील उमेदवार अमित पाटील, तसेच वाघेरी पंचायत समिती गणातील उमेदवार सौ. नीलम पिसाळ यांच्या प्रचारार्थ शिरवडे (ता. कराड) येथे आयोजित जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी कोयना दूध संघाचे संचालक सुदामराव चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश कुंभार, शेतकरी संघटनेचे नेते सचिन नलवडे, रंगराव चव्हाण, श्रीरंग चव्हाण, माजी सरपंच बाळासाहेब पवार, भानुदास पोळ, संजय पिसाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मोठेपण काहींना खुपतेय : कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गट हा स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर चालणारा, अन्यायाविरोधात उभा राहणारा स्वाभिमानी गट असल्याचे सांगत रामकृष्ण वेताळ म्हणाले, या गटाने कधीही अन्याय सहन केला नाही. सामान्य माणूस मोठा होत असल्याचे काहींना खुपत आहे. माझ्या २३ वर्षांच्या सामाजिक, राजकीय वाटचालीत मी नेहमीच लोकांची कामे केली, विकासाला प्राधान्य दिले. कोणत्याही संविधानिक पदावर नसतानाही उत्तरेतील अनेक गावांना निधी उपलब्ध करून दिला.

उत्तरेच्या विजयात कार्यकर्त्यांची मेहनत : विधानसभेत मिळालेल्या ४० हजारांच्या लीडमागे सामान्य कार्यकर्त्यांची मेहनत आहे. अशावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याऐवजी वटहुकूमशाही लादली जात आहे, हे जनतेला मान्य नाही. आता या अन्यायाला वाचा फोडण्याची वेळ आली आहे. कोपर्डे हवेली गट व गण आणि वाघेरी पंचायत समिती गणातील एकही गाव विकासापासून वंचित राहू देणार नाही, अशी ग्वाही श्री. वेताळ यांनी दिली.

विकासकामांसाठी कटिबद्ध : यावेळी उमेदवार सौ. विद्या वेताळ यांनी रस्ते, पाणी, वीज तसेच शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

विकासात्मक व्हिजनची मांडणी : यावेळी उमेदवार अमित पाटीलसौ. नीलम पिसाळ यांनीही आपल्या विकासात्मक व्हिजनची मांडणी केली.

आवाहन : कार्यक्रमात सुदामराव चव्हाण, सुरेश कुंभार, सचिन नलवडे, रंगराव चव्हाण, भानुदास पोळ यांनी मनोगत व्यक्त करत विकासाची गंगा अखंड राहण्यासाठी रामकृष्ण वेताळ यांच्या नेतृत्वाखालील अपक्ष उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.

उपस्थिती : या सभेस लालासो पाटील, अंकुश थोरात, नंदकुमार चव्हाण, सोपान चव्हाण, संदीप बाबर, दादासो थोरात, जयसिंग डांगे, याकूब पटेल, जयराम दुबल, शिवाजी इंगवले, रमेश काटकर, सयाजी शिंदे, प्रल्हाद भोसले यांच्यासह शिरवडे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक रणजीत थोरात यांनी केले. तर आभार सतीश पाटील यांनी मानले.

…लोकांच्या मनातून काढणे अशक्य

स्वाभिमानी नेत्याला पक्षातून काढून टाकण्याचे प्रयत्न सुरू असतील; मात्र लोकांच्या मनातून रामकृष्ण वेताळ यांना काढणे कोणालाही शक्य नाही. मी सत्तेपेक्षा लोकांच्या मनात राहणे पसंत करतो आणि कराड उत्तरचा स्वाभिमान जनताच दाखवून देईल, असा ठाम इशारा रामकृष्ण वेताळ यांनी विरोधकांना दिला.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!