कराडला 14 ते 16 डिसेंबरदरम्यान  28 व्या विजय दिवस समारोहाचे आयोजन 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

ज्येष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार यांना ‘जीवन गौरव यशवंत’ पुरस्कार जाहीर 

कराड/प्रतिनिधी : – 

भारतीय सैन्यदलाच्या बांगला मुक्तीसंग्रामातील अभूतपूर्व पराक्रमाच्या स्मरणार्थ कराडमध्ये दरवर्षी साजरा होणारा विजय दिवस समारोह यंदा 14 ते 16 डिसेंबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. 1998 पासून सुरू असलेल्या या उपक्रमाच्या 28 व्या पर्वाची माहिती विजय दिवस समारोह समितीचे सचिव ॲड. संभाजीराव मोहिते यांनी दिली.

पत्रकार परिषद : येथील शासकीय विश्रामगृहात विजय दिवस समारोहाची माहिती देण्यासाठी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेचे बोलत होते. यावेळी समितीचे सदस्य चंद्रकांत जाधव, तसेच सहसचिव विलासराव जाधव उपस्थित होते.

रक्तदान शिबिर व शस्त्रास्त्र संमेलनाचे उद्घाटन : उपक्रमांची सविस्तर माहिती देताना ॲड. मोहिते म्हणाले, 14 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी आखाडा, कराड येथे रक्तदान शिबिराने कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे. त्याच दिवशी दुपारी 3 वाजता सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात शस्त्रास्त्र संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

महासैनिक संमेलन : 15 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता सौ. वेणूताई चव्हाण सभागृहात महासैनिक संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.

पुरस्कार वितरण सोहळा : यावर्षी समितीचा मानाचा ‘जीवन गौरव यशवंत’ पुरस्कार कराडचे ज्येष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार (कराड) यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच सत्यभामा ज्ञानदेव कणसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा ‘आदर्श माता’ पुरस्कार तब्बल पन्नास वर्षांपासून जखमी पशुपक्ष्यांवर उपचार करणाऱ्या साहाराबी सय्यद (कराड) यांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला भारतीय सैन्यदलाचे ब्रिगेडियर जोयदीप मुखर्जी प्रमुख उपस्थित राहणार असून, डॉ. महादेव सगरे, सहकार्यवाह, भारती विद्यापीठ पुणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सरसेनापतींच्या समाधीस्थळी अभिवादन : या समारोहाच्या समारोप दिनी, 16 डिसेंबर रोजी तळबीड (ता. कराड) येथे भारतीय सैन्यदलाच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांच्या समाधीस मान्यवरांच्या उपस्थितीत मानवंदना अर्पण केली जाणार आहे.

आवाहन : विजय दिवस समारोहातील सर्व कार्यक्रमांना नागरिक, युवा आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, देशभक्तीचा संदेश अधिक बळकट करावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष कर्नल संभाजीराव पाटील यांच्यावतीने ॲड. संभाजीराव मोहिते यांनी केले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!