‘साखर उद्योग गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्धल केला सत्कार
कराड/प्रतिनिधी : –
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुरेश भोसले यांना डेक्कन शुगर असोसिएशनचा प्रतिष्ठेचा ‘साखर उद्योग गौरव पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सातत्याने प्रगती : यावेळी बोलताना आनंदराव पाटील म्हणाले, डॉ. भोसले यांनी सहकार, साखर उद्योग आणि आरोग्य क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने सातत्याने प्रगती साधत राज्यातील अग्रगण्य साखर कारखान्यांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करताना सभासद शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याची भूमिका त्यांनी कायम जपली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
महत्त्वपूर्ण योगदान : कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, शेती आणि सामाजिक बांधिलकी या क्षेत्रांतही डॉ. भोसले यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे पाटील यांनी अधोरेखित केले. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी केलेले कार्यही विशेष उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
बहुआयामी कार्याचा योग्य सन्मान : डेक्कन शुगर असोसिएशनने जाहीर केलेला ‘साखर उद्योग गौरव पुरस्कार’ हा डॉ. सुरेश भोसले यांच्या बहुआयामी कार्याचा योग्य सन्मान असून, तो सातारा, सांगली जिल्ह्यासह संपूर्ण सहकार क्षेत्रासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना आनंदराव पाटील यांनी व्यक्त केली.
शुभेच्छा : साखर उद्योग, सहकार चळवळ, शेतकरी हित आणि आरोग्यसेवा क्षेत्राच्या विकासासाठी डॉ. भोसले यांनी भविष्यातही याच समर्पणाने कार्य सुरू ठेवावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.