सहकारमंत्री बाबासाहेब पाटील; यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी केले अभिवादन
कराड/प्रतिनिधी : –
राज्यातील कर्जबुडव्या सहकारी साखर कारखान्यांवर सरकारने कारवाईची गती वाढवली असून, मोठ्या प्रमाणातील अनुत्पादक कर्जे घेतलेल्या आणि एफआरपी न दिलेल्या अनेक कारखान्यांवर आरआरसी (जमाक्रिया प्रक्रिया) काढण्यात आल्याची माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. अजूनही अशा कारखान्यांची नावे असतील तर द्या, त्यांच्यावरही निश्चित कारवाई करू, असा ठाम इशारा त्यांनी दिला.
अभिवादन : येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी ते संवाद साधत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर, राजेश पाटील – वाठारकर, प्रा. शरद काटकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
…यादी द्या, त्यांच्यावर कारवाई करू : राज्यातील काही सहकारी साखर कारखाने भरमसाठ कर्ज उचलतात, ढिसाळ व्यवस्थापनामुळे कारखाने डबघाईला येऊन कर्ज बुडवतात, यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होते. अशा कारखान्यांवर काय कारवाई करणार आहात? या प्रश्नावर बोलताना त्यांनी, अशा कारखान्यांची नावे द्यावीत, त्यांच्यावर नक्कीच कारवाई करू. या संदर्भातील आमच्याकडे नावे आलेल्या कारखान्यांवर आम्ही कारवाई करत असल्याचे स्पष्ट केले.
नवे कायदे करण्याचे काम सुरू : संस्थांच्या लेखापरीक्षणात ‘अ वर्ग’ शेरा असतानाही गैरव्यवहार उघड होत असल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, लेखा परीक्षकांना जबाबदार धरण्याचा कायदा करण्याचे काम सुरू आहे. नागरिकांकडूनही सूचना मागविल्या असून, नवीन कायदा मजबूत आणि कडक असेल, असे त्यांनी सांगितले.
३० जून पर्यंत कर्जमाफीचा निर्णय : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बोलताना सहकारमंत्री म्हणाले, कर्जमाफी संदर्भात विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी कोणीही भाष्य करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे त्यावर टिप्पणी करणे उचित नाही. मात्र कर्जमाफीसाठी ३० जूनची अंतिम मुदत देण्यात आली असून, सरकार त्या कालावधीत निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.
परदेशी तज्ज्ञ समिती कडून माहिती संकलन : कर्जमाफीचा सहकार खात्यावर होणारा परिणाम, तसेच किती कर्जदार थकबाकीत आहेत, याचे अचूक आकडे गोळा करण्याचे काम सुरू आहे. यासाठी परदेशी तज्ज्ञ समिती नेमण्यात आली असून, ती समिती सर्व माहिती संकलित करत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.