शिवाजी उद्यान ग्रुपतर्फे खुले चर्चासत्र; कराडकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
कराड/प्रतिनिधी : –
कराड शहराच्या नेतृत्वासाठी कोण योग्य? याचे उत्तर नागरिकांनाच शोधता यावे, यासाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे खुल्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र शिवाजीनगर हाऊसिंग सोसायटी परिसरात, छत्रपती शिवाजी उद्यानालगत होणार आहे.
निर्णय घेण्याची हीच वेळ : कराड शहराला शैक्षणिक, वैद्यकीय आणि व्यापारी क्षेत्रासह ऐतिहासिक वारसा लाभला असून शहर जलद गतीने नागरीकरणाच्या टप्प्यातून पुढे जात आहे. अशा पार्श्वभूमीवर आगामी कराड नगरपालिका निवडणुकीत कोणत्या व्यक्तीकडे शहराचे नेतृत्व सोपवायचे, याचा निर्णय घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
विशेष चर्चासत्र : कराड शहराच्या नगराध्यक्ष पदासाठी स्पर्धेत असलेल्या उमेदवारांची विकासदृष्टी, शहरासंबंधी त्यांचे व्हिजन, तसेच कराडच्या तातडीच्या समस्या आणि त्यावरचे उपाय जाणून घेण्यासाठी सोमवार, दि. 24 नोव्हेंबर रोजी सायं. 6 वाजता छत्रपती शिवाजी उद्यानालगत हे विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
नागरिकांनी विचारणार उमेदवारांना थेट प्रश्न : कराड शहराचा पहिला नागरिक म्हणून निवडून येणारा नगराध्यक्ष सक्षम, दूरदर्शी आणि विकासाभिमुख असणे अत्यावश्यक असल्याचे संयोजकांनी सांगितले. चुकीच्या निवडीमुळे नंतर पश्चात्तापाची वेळ येऊ नये, म्हणूनच नागरिकांनी उमेदवारांना थेट प्रश्न विचारून त्यांच्या कार्ययोजनेची कसून छाननी करावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे.
स्पष्ट धोरण जाणून घेणार : शहरातील वेगाने वाढणाऱ्या नागरी वसाहती, वाहतूक, पायाभूत सुविधा, स्वच्छता व्यवस्थापन, उद्यानांचा विकास, तसेच सार्वजनिक सेवांच्या गुणवत्तेबाबत उमेदवारांचे स्पष्ट धोरण जाणून घेण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे ठरणार आहे.
आवाहन : कराड शहरातील सर्व नागरिकांनी या लोकशाही संवादात उपस्थित राहून आपल्या शहराच्या भविष्यासाठी सजग भूमिका निभवावी, असे आवाहन छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.











