जगन्नाथ रथयात्रा कराडमध्ये उत्साहात साजरी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रथमच आयोजन; संभाजी भिडे (गुरुजी) यांचा सहभाग, वातावरण भक्तीमय

कराड/प्रतिनिधी : –

ओडिशातील पुरी येथे दरवर्षी भव्यतेने पार पडणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेच्या धर्तीवर, अशीच रथयात्रा कराड शहरात प्रथमच आयोजित करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजेच इस्कॉन (ISKCON) तर्फे आयोजित या रथयात्रेला शहरातील नागरिक, भाविक आणि भक्तांनी भरघोस प्रतिसाद दिला.

‘हरे कृष्ण, हरे राम’चा गजर : शनिवारी करण्यात आलेल्या या रथयात्रेत भगवान श्री जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची सुंदर आणि सजवलेली मूर्ती रथात विराजमान करण्यात आली होती. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने रथ ओढण्याचा मान मिळवण्यासाठी उत्साहाने सहभाग घेतला. रथ ओढताना ‘हरे कृष्ण, हरे राम’ च्या गजरात शहरातील वातावरण मंत्रमुग्ध झाले होते.

रथयात्रा मार्ग : रथयात्रेला शिवतीर्थ दत्त चौक येथून सुरुवात झाली. नंतर ही यात्रा भेदा चौक, कार्वे नाका मार्गे सिद्धार्थ मंगल कार्यालय, गोळेश्वर येथे पोहोचली. रथयात्रेमध्ये भाविकांसाठी विविध कीर्तन, भजन, ढोल-ताशांचे वादन, तसेच फूलांची सजावट आणि सांस्कृतिक झांज्या पाहायला मिळाल्या.

संभाजी भिडे (गुरुजी) यांची उपस्थिती : याप्रसंगी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (गुरुजी) यांनी देखील उपस्थिती लावून भगवान जगन्नाथाच्या चरणी अभिवादन केले. त्यांच्या उपस्थितीने रथयात्रेला अधिक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले.

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन :  रथयात्रेनंतर सिद्धार्थ मंगल कार्यालयात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात भागवत कथा, प्रवचन, गीता ज्ञान, तसेच प्रसाद वितरण करण्यात आले. लहान मुलांसाठी कथाकथन आणि कृष्ण लीला यांचे सादरीकरण करण्यात आले होते.

अध्यात्मिक अनुभवाचा लाभ : या रथयात्रेचे आयोजन कराडसारख्या शहरात प्रथमच झाल्याने नागरिकांमध्ये मोठा उत्साह आणि कौतुकाचे वातावरण होते. अनेक भाविकांनी आपापल्या परिवारासह सहभागी होऊन या अनोख्या अध्यात्मिक अनुभवाचा लाभ घेतला.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!