कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदारसंख्येत झालेली अचानक वाढ, दुबार व तिबार नावांची भर, आणि मतदानाच्या टक्केवारीत संशयास्पद वाढ या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची भूमिका पूर्णतः संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
पत्रकारांशी संवाद : मुंबईत पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी भाजप सरकारने निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून लोकशाही प्रक्रियेलाच गालबोट लावले असल्याचा दावा त्यांनी केला.
महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलाच प्रकार : “जय-पराजय हा निवडणूक प्रक्रियेचा भाग असतो, पण पक्षपाती पद्धतीने निकाल वळविण्याचा प्रकार महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतिहासात घडला आहे,” असे म्हणत त्यांनी निवडणूक आयोगावर थेट टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
दुबार नावे वगळली नाहीत : श्री. चव्हाण म्हणाले, लोकसभा ते विधानसभा निवडणूक दरम्यान अवघ्या ४-५ महिन्यांत मतदारसंख्येत लक्षणीय वाढ झाली. एका व्यक्तीचे नाव ३-४ ठिकाणी असूनही आयोगाने ते तपासले नाही, असे उदाहरण त्यांनी स्वतःच्या मतदारसंघातील पाहणीच्या आधारे दिले. “एखाद्या व्यक्तीचे नाव जर ३-४ बूथवर असेल, त्याच्याकडे EPIC कार्ड असेल, तर तो मोकळेपणाने मतदान करू शकतो. आयोगाने ही नावे तपासून वगळायला हवी होती, पण ते केले गेले नाही,” असा आरोपही त्यांनी केला.
गंभीर त्रुटींवर टाकला प्रकाश : पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लेखाचा संदर्भ देत निवडणूक प्रक्रियेतील गंभीर त्रुटींवर प्रकाश टाकला. राहुल गांधींनी स्पष्टपणे म्हटले आहे की, “मॅच फिक्सिंगसाठी अंपायर फिक्स करावा लागतो, आणि भाजपने तो फिक्स केला आहे.”
काँग्रेसने आक्षेप घेतले होते : निवडणूक आयोगातील प्रमुख अधिकाऱ्यांची निवड ही प्रक्रियेपूर्वी बदलण्यात आली आणि त्याविरोधात काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतले होते. या प्रकरणी काँग्रेससह विरोधी पक्षांनी एकमताने निर्णय घेतला असून, जवळपास १०० हून अधिक पराभूत उमेदवारांनी निकालाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. “न्याय मिळेल की नाही, हे माहीत नाही, पण निवडणूक प्रक्रिया तरी पारदर्शक होईल ही अपेक्षा आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपवर ‘निवडणूक चोरण्याचा’ आरोप
राहुल गांधींनी त्यांच्या विविध भाषणांत, लेखात आणि परदेश दौऱ्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ‘भाजपने सत्तेचा वापर करून चोरली’ असल्याचा ठाम आरोप केला आहे. तसेच”निवडणूक आयोगाने तात्काळ डुप्लिकेट नावे हटवण्यासाठी ‘डी-डुप्लिकेशन सॉफ्टवेअर’ वापरावे आणि सर्व मतदार यादींची फेरतपासणी करावी,” अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.