कराड/प्रतिनिधी : –
आमदार अतुलबाबा भोसले हे दमदार नेतृत्व आहेत. पक्षाने त्यांच्यावर आतापर्यंत दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी सक्षमपणे पेलल्या आहेत. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने त्यांना सातारा जिल्हाध्यक्षपदाची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा संपूर्णत: भाजपमय होईल, असा विश्वास भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
माध्यमांशी संवाद : मलकापूर येथे महिला मेळावा आणि जाहीर कार्यकर्ता पक्षप्रवेश अशा संयुक्त कार्यक्रमप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
अतुलबाबांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी आलोय : आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भव्य महिला मेळावा आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यानिमित्त त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी आपण आज येथे आलो आहोत, असे सांगत आमदार चव्हाण म्हणाले, महिला मेळावा कार्यक्रमात जवळपास दहा हजार बांधकाम कामगार महिलांना भांडी वाटप करण्यात आले, ही कौतुकाची बाब असून सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दलही आपण त्यांचे कौतुक केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सैन्यदलाच्या समर्थनार्थ १२५० पेक्षा जास्त तिरंगा यात्रा : पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्यदलाने राबवलेले ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले. त्यानंतर देशभरात भारतीय सैन्यदलाच्या समर्थनार्थ १२५० पेक्षा जास्त तिरंगा यात्रा निघाल्या. यामध्ये सातारा जिल्हा, तसेच कराड तालुक्यातील मंडलनिहाय तिरंगा यात्रा यशस्वीपणे काढण्यात आल्या. याबद्दलही आपण आ. अतुलबाबांचे कौतुक केल्याचे आमदार चव्हाण यांनी यावेळी सांगितले.