शंभूतीर्थ परिसरातील विद्युत तारांच्या स्ट्रक्चरचे स्थलांतर करा 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आ. डॉ. अतुलबाबा भोसले; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पिली आग्रही मागणी 

कराड/प्रतिनिधी : – 

येथील श्री शंभूतीर्थ परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक साकारले जात आहे. पण याठिकाणी असलेल्या विद्युत तारांच्या स्ट्रक्चरमुळे या स्मारकाच्या कामाला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे या विद्युत तारांच्या स्ट्रक्चरचे तातडीने स्थलांतर करावे, अशी आग्रही मागणी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सातारा येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली.

जिल्हा नियोजन बैठक : या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या मागणीची तातडीने दखल घेत, एम.एस.ई.बी.ला या विद्युत तारांच्या स्ट्रक्चरचे तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे श्री शंभूतीर्थ परिसरात साकारल्या जात असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक कामातील अडथळा दूर होण्यास मदत होणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती : सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यासह आ. डॉ. अतुलबाबा भोसले, आ. मनोज घोरपडे, आ. सचिन पाटील, आ. शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा पोलिसप्रमुख समीर शेख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

स्मारकासाठी आठ कोटींच्या निधी : छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक कराडमध्ये असावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून कराडकरांमधून केली जात होती. या मागणीची दखल घेत, गेल्या महायुती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी या स्मारकासाठी ८ कोटींचा निधी मंजूर केला. या निधीतून सध्या हे काम प्रगतीपथावर आहे.

स्थलांतरासाठी ९२ लाखांचा खर्च :या स्मारक परिसरात असलेल्या विद्युत तारांच्या स्ट्रक्चरचा अडथळा निर्माण झाल्याने गेल्या काही दिवसांपासून हे काम रखडले होते. विद्युत तारांच्या स्ट्रक्चरचे स्थलांतर करण्यासाठी सुमारे ९२ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

पालकमंत्र्यांच्या सूचना : दरम्यान, आज झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. स्मारकाचे काम वेगाने प्रगतीपथावर असून, विद्युत तारांच्या स्ट्रक्चरचा अडथळा दूर झाल्यास या कामाला आणखी गती मिळू शकेल, असे मत व्यक्त केले. याची दखल घेत, पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी एम.एस.ई.बी.ला देखभाल दुरुस्ती खर्चातून या विद्युत तारांच्या स्ट्रक्चरचे तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या.

वानरवाडी बंधाऱ्यासाठी वन जमीन मिळावी 

कराड तालुक्यातील वानरवाडी बंधाऱ्याचा प्रश्नही आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी या बैठकीत उपस्थित केला. वानरवाडी येथे मातीचा बंधारा गेली अनेक वर्ष पूर्ण आहे. परंतु त्या बंधार्‍यामध्ये पाणी साठवता येत नाही; कारण त्या बंधार्‍याच्या सांडव्याच्या कामासाठी वन खात्याच्या अखत्यारितील जमीन लागणार आहे. ही जमीन न मिळाल्यामुळे गेली अनेक वर्ष हा मातीचा बंधारा पाणी साठवण्यापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे येथील वनजमीन तातडीने मिळावी, अशी जोरदार मागणी आ.डॉ. भोसले यांनी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवित, याप्रश्नी जिल्हाधिकारी, वनाधिकारी, तसेच जलसंधारण विभागाचे अधिकारी यांची आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेण्याचे निर्देश दिले. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!