कराड एस.टी. आगाराला मिळणार नवीन बसेस

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मागणीला परिवहन मंत्र्यांचा हिरवा कंदील

कराड/प्रतिनिधी : – 

कराड तालुक्यातील प्रवाशांना दर्जेदार व वेळेवर एस.टी. सेवा मिळावी, यासाठी कराड आगाराला नवीन बसेस मिळाव्यात, अशी मागणी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. आ. अतुलबाबा भोसले यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, ना. सरनाईक यांनी सध्या पहिल्या टप्प्यात शक्य तितक्या उपलब्ध बसेस तातडीने कराड आगाराला देण्याचे निर्देश राज्याच्या परिवहन आयुक्तांना दिले आहेत.

कराड महत्वाचे केंद्र : पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे व्यावसायिक व शैक्षणिक केंद्र असलेल्या कराड तालुक्यातील लोकांचा दैनंदिन प्रवास वाढतच आहे. कराड हे केवळ सातारा जिल्ह्याचेच नव्हे; तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील कृषी, शिक्षण, आरोग्य, साखर उद्योग अशा विविध क्षेत्रांत अग्रगण्य आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे.

दररोज ५०-६० हजार प्रवासांचा प्रवास : सध्या कराड एस.टी. आगारातून दररोज अंदाजे ५० ते ६० हजार प्रवासी प्रवास करतात. मात्र आगाराकडे केवळ ५० बसेसच उपलब्ध असून, त्या सर्वच जुन्या आणि देखभाल अवस्थेत आहेत. त्यामुळे अनेकदा बसेस वेळेवर धावत नाहीत. तसेच बऱ्याचदा ब्रेकडाउन होत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.

परिवहन मंत्र्यांची घेतली भेट : ही बाब लक्षात घेऊन, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुंबईत मंत्रालयात राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, कराड आगाराला नवीन किमान ३० बसेस उपलब्ध करून देण्याचे निवेदन सादर केले.

परिवहन आयुक्तांना निर्देश : या निवेदनाची तातडीने दखल घेत ना. सरनाईक यांनी कार्यवाही करण्याचे आदेश राज्याच्या परिवहन आयुक्तांना देत, सध्या पहिल्या टप्प्यात शक्य तितक्या उपलब्ध बसेस तातडीने कराड आगाराला देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे लवकरच कराड एस.टी. आगाराला नवीन बसेस मिळणार आहेत.

प्रवास होणार सुरक्षित : या निर्णयामुळे कराडमधील एस.टी. सेवा अधिक सक्षम होणार असून, प्रवास अधिक सुरक्षित, वेळेवर आणि आरामदायक होईल. याचा थेट फायदा नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे.

एक लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे की, नागरिकांच्या अडचणी शासन दरबारी पोहोचवाव्यात आणि त्यावर त्वरित निर्णय घडवून आणावेत. कराड तालुकावासियांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी मी सदैव तत्पर असून, त्यांच्यासाठी सकारात्मक बदल घडवण्याचा माझा प्रयत्न सुरूच राहील.

– आ. डॉ. अतुलबाबा भोसले

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!